कोरोना काळात कर्तव्यात कसूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:36 AM2021-04-23T04:36:28+5:302021-04-23T04:36:28+5:30
केज : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासन अहोरात्र काम करत असताना आपत्तीच्या काळात नगर पंचायतीचे मुख्याधिकारी ...
केज : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासन अहोरात्र काम करत असताना आपत्तीच्या काळात नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मात्र मुख्यालयी हजर राहत नसल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनास आले आहे. संचारबंदी काळात जमावबंदी असल्याने गर्दी होऊ नये तसेच कोरोना संसर्ग रोखण्याबाबत कसलेही नियोजन केले नसल्याने तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी नगर पंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी मिलिंद सावंत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
तालुका प्रशासन कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अहोरात्र सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये
महसूल, आरोग्य, पोलीस, आशा वर्कर्स, शिक्षक व अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. अशा कठीण परिस्थितीत संचारबंदी लागू असताना ठरवून दिलेल्या वेळेनंतर होणारी गर्दी टाळण्यासाठी नगर पंचायतीचे प्र. मुख्याधिकारी सावंत यांनी नियोजन केले नाही. तसेच मुख्यालयी हजर न राहता कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणा केला. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग प्रतिबंधात्मक योग्य नियोजन केले नाही तसेच लेखी आदेश व सूचना देऊनही दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याने वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर केल्याप्रकरणी तहसीलदार मेंढके यांनी कठोर भूमिका घेत मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर नोटीस मिळाल्यापासून चोवीस तासांच्या आत लेखी खुलासा सादर न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.