दुय्यम निबंधक कार्यालयास नियमित दुय्यम निबंधक मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:33 AM2021-01-20T04:33:34+5:302021-01-20T04:33:34+5:30
गेवराई : गेवराई येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर कामकाज सुरू होते. त्यातच तीन महिन्यात ...
गेवराई : गेवराई येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर कामकाज सुरू होते. त्यातच तीन महिन्यात चार प्रभारी अधिकारी बदलल्याने कार्यालयातील कामकाज पूर्णतः कोलमडले होते. वेळेवर कामे होत नसल्याने जमीन, प्लाॅट, घर आदी खरेदी - विक्रीसाठी शेतकरी, नागरिकांना कार्यालयात ताटकळत बसावे लागत होते. शिवाय वारंवार खेटे मारण्याची वेळ येत होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी येथे नियमित दुय्यम निबंधक यांची नियुक्ती झाल्याने त्यांनी रेंगाळलेला कारभार पूर्वपदावर आणला आहे.
कार्यालयात वेळेवर कामे होऊ लागल्याने समाधान व्यक्त होऊ लागले आहे. शासनाला सर्वाधिक महसूल निबंधक कार्यालयातून जातो. या कार्यालयाअंतर्गत कर्ज प्रकरणातील गहाणखत, जमीन, प्लाॅट, घर खरेदी - विक्रीची कामे होतात. गेवराई शहरात मोंढा भागात दुय्यम निबंधक श्रेणी - १चे कार्यालय आहे. या कार्यालयात रोज मोठ्या प्रमाणावर खरेदी - विक्री करण्यासाठी शेतकरी, नागरिकांची गर्दी असते. मात्र, या कार्यालयातील कायम दुय्यम निबंधक यांना तीन महिन्यांपूर्वी बीड जिल्हा कार्यालयात बोलावून याठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यातच तीन महिन्यात चार प्रभारी अधिकारी बदलल्याने येथील कर्मचाऱ्यांवरील वचक कमी झाल्याने कार्यालयातील कामकाज पूर्णतः कोलमडले गेले होते. परिणामी खरेदी - विक्रीसाठी आलेल्या शेतकरी, नागरिकांची कामे वेळेवर होत नव्हती. कामे वेळेवर होत नसल्याने अनेकदा गोंधळदेखील होत होता.
खरेदी - विक्रीसाठी आलेल्या नागरिकांना कार्यालयात ताटकळत बसावे लागत होते, तसेच वारंवार खेटे मारावे लागत असल्याने संताप व्यक्त होत होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी येथे नियमित दुय्यम निबंधक बी. डी. दारेवार हे रूजू झाले आहेत. त्यांनी या कार्यालयातील रेंगाळलेला कारभार पुन्हा एकदा सुरळीत केला आहे. सर्वर डाऊन वगळता इतर वेळेत योग्य नियोजन करून जमीन खरेदी - विक्रीचे कामकाज होऊ लागले आहे. त्यांच्या योग्य नियोजनामुळे सध्या या कार्यालयात व्यवहारासाठी ताटकळत बसावे लागत नाही. त्यामुळे सध्या कार्यालयातील कामांची गती वाढली असून, कामे वेळेवर होऊ लागल्याने खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी, नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
खरेदी - विक्रीसाठी येणाऱ्या नागरिकांची कामे लवकर व वेळेत व्हावीत, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. कार्यालयात कोणाचीही अडवणूक व त्यांच्या कामात दिरंगाई होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांना दक्षता घेण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
बी. डी. दारेवार दुय्यम निबंधक, गेवराई