कार्यालय शासकीय; जाहिरात खाजगी
By Admin | Published: July 8, 2017 12:27 AM2017-07-08T00:27:29+5:302017-07-08T00:27:59+5:30
बीड : शहरात मागील काही वर्षांपासून फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरात मागील काही वर्षांपासून फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच जाहिरातींमधून व्यवसाय करणारेही कमी नाहीत. परंतु हे सर्व जाहिरातीवाले सर्रासपणे नियमांचे उल्लंघण करून शासकीय कार्यालयातच जाहिराती लावत असल्याचे ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या ‘स्टिंग’मधून समोर आले.
कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला कार्यालयीन भिंती अथवा फलकांवर ‘येथे जाहिरात लावण्यास सक्त मनाई आहे’, असा आदेश दिसतो. प्रत्यक्षात कार्यालयात गेल्यानंतर वेगळे दृश्य पाहावयास मिळते. विशेष म्हणजे अधिकारी, कर्मचारी हे आदेश रोज नजरेखालून घालतात; परंतु त्यांच्या जवळच सर्वत्र खाजगी जाहिरातींचे फलक, पॉम्प्लेट, बॅनर लागलेले दिसतात. यावर बोलण्यास ते धजावत नाहीत. अधिकारीही याकडे दुर्लक्ष करतात. शुक्रवारी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय, नगर परिषद इ. ठिकाणी पाहणी केली असता सर्वच कार्यालये जाहिरातींच्या फलकांनी विद्रूप झाल्याचे आढळून आले.