१० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या गळाला ‘बडा मासा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:04 AM2017-11-24T00:04:32+5:302017-11-24T00:04:39+5:30
मत्स्य व्यवसायाचा ठेका आदेश देण्यासाठी व ठेका भरणा केलेल्या डी.डी. रकमेच्या पावत्या देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना मस्त्य व्यवसायक विकास कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी बबन तुकाराम तुंबारे हा मोठा ‘मासा’ एसीबीच्या गळाला लागला. गुरुवारी दुपारी तीन वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही कारवाई झाली.
बीड : मत्स्य व्यवसायाचा ठेका आदेश देण्यासाठी व ठेका भरणा केलेल्या डी.डी. रकमेच्या पावत्या देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना मस्त्य व्यवसायक विकास कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी बबन तुकाराम तुंबारे हा मोठा ‘मासा’ एसीबीच्या गळाला लागला. गुरुवारी दुपारी तीन वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही कारवाई झाली.
गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथील शहादत मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्या, बंगाली पिंपळगाव या संस्थेला तलावाचा ठेका देण्यासाठी संबंधित तक्रारदार हा नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रे घेऊन तुंबारेकडे रोज खेटे मारत होता. परंतु तो आज-उद्या करून चालढकल करीत असे. त्यानंतर त्याने ठेका आदेश देण्यासाठी २० हजार रूपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. याची खात्री एसीबीकडून करण्यात आली. गुरूवारी दुपारी तुंबारेने लाचेची मागणी करून १० हजार रूपये स्विकारले. याचेवळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकारी, कर्मचाºयांनी त्याला झडप घालून पकडले. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्रीकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, श्रीराम खटावकर, विकास मुंडे, सुशांत सुतळे, राकेश ठाकूर, सय्यद नदीम आदींनी केली.
पैसे घेण्यासाठी तुंबारे भर उन्हात तक्रारदारच्या प्रतीक्षेत
तुंबारे हा वर्ग दोनचा अधिकारी आहे. त्याने तक्रारदाराला तात्काळ शिवाजी चौकात पैसे घेऊन बोलविले. एसीबीने त्याप्रमाणे ‘जाळे’ टाकले होते. बसस्थानकाच्या बाजूने जाणाºया नवीन झालेल्या सिमेंट रस्त्यावर तो
तक्रारदारची भर उन्हात प्रतीक्षा करीत होता. तक्रारदाराकडून लाच स्वरूपात दहा हजार रुपये स्वीकारताच एसीबीने टाकलेल्या जाळ्यात तो अलगद सापडला.
या बड्या ‘माशाने’ यापुर्वीही अनेकांकडून लाच स्वरूपात माया गोळा केल्याचे बोलले जात आहे. केवळ तक्रार नसल्याने तो यामध्ये यशस्वी झाला. अखेर गुरूवारी हा मासा जाळ्यात अडकला.
सहायक आयुक्त पदाचा अतिरक्त पदभारही तुंबारेकडेच
एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या या बड्या माशाकडे सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार होता. त्यामुळे कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे छोटे-मोठे काम असले तरी तुंबारे त्यांच्याकडून लाचेची मागणी करीत असे, असे समजते. त्याच्या लाचखोरीला मत्स्य व्यवसायिक आणि ठेकेदार वैतागलेले होते.