थकित ऊस बिलासाठी माजलगावात अधिकाऱ्यांना कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:23 PM2018-08-06T23:23:58+5:302018-08-06T23:24:22+5:30
माजलगाव : मागील आठ महिन्यांपासून ऊस बिलाचे पैसे थकविल्यामुळे सोमवारी दुपारी जय महेश कारखान्यासमोर एका शेतक-याने आत्महत्येचा प्रत्यत्न केला. वेळीच शेतक-यांनी त्यांना रोखले. संतप्त शेतक-यांनी जय महेश साखर कारखान्याच्या अधिका-यांना कोंडले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सदर अधिका-यांना पोलीस ठाण्यात आणले.
पवारवाडी येथील जय महेश या खाजगी साखर कारखान्याने मागील वर्षी आठ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. गाळप हंगाम संपून आठ महिने झाले असताना अद्यापही कारखाना प्रशासनाने मात्र गाळपासाठी आणलेल्या शेतकºयांच्या उसाचे अद्यापही दिले नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
थकीत पैशांसाठी शेतक-यांनी अनेकवेळा खेटे मारले, साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या तरीही शेतकºयांना ऊसाचे पैसे भेटले नाहीत. यामुळे सोमवारी काही शेतकºयांनी कारखाना गेटसमोर आंदोलन केले. यावेळी वडवणी तालुक्यातील देवगाव येथील बाबू भागूजी गवळी (वय ५८) यांनी सोबत आणलेले विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात बाजूच्या शेतकºयांनी त्यांना रोखून आत्महत्येपासून परावृत्त केले.
यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी थेट कारखान्याच्या कार्यालयात जाऊन शेतकी अधिकारी वाय. आर. कदम, एच.आर. शाखाधिकारी कैलास चौधरी, सुरक्षा अधिकारी बरुळे यांच्यासह अनेक कर्मचाºयांना त्यांच्या खोलीत कोंडून ठेवले. दोन तासानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिर्झा बेग, पोलीस उप निरीक्षक विकास दांडे, शिवसेनेचे अप्पासाहेब जाधव यांनी हस्तक्षेप करून शेतकी अधिकारी वाय. आर. कदम, एच.आर. शाखाधिकारी कैलास चौधरी, सुरक्षा अधिकारी बरुळे यांच्यासह अनेक कर्मचारी, शेतकरी यांना पोलीस ठाण्यात घेऊन आले.
पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन
शेतकºयांचे थकीत बिल देण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली, लेखी निवेदने दिली; परंतु कारखान्याच्या अधिका-यांनी साखर आयुक्तांपर्यंत सर्वांनाच ‘मॅनेज’ केले. बिल थकल्याने शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. आता दोन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- अप्पासाहेब जाधव
शिवसेना नेते