चोरट्यांच्या झटापटीत वृद्धाचा मृत्यू ? चोरीच्या वेळी परिसरातील घरांना लावल्या होत्या बाहेरून कड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 07:33 PM2021-05-17T19:33:16+5:302021-05-17T19:38:08+5:30
पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथे अज्ञात चोरटे चोरीच्या उद्देशाने आले होते.
बीड : तालुक्यतील वैद्यकिन्ही येथे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांसोबत झालेल्या झटापटीत एका ६५ वर्षीय वृद्दाचा मृत्यू झाल्याचा संशय घरच्या मंडळींनी व्यक्त केला आहे. ही घटना रविवारी पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी चोरट्यांनी परिसरातील घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू बाबूराव जाधव (६५) असे झटापटीत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथे अज्ञात चोरटे चोरीच्या उद्देशाने आले होते. यावेळी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विष्णू जाधव यांचे कुटुंब घराच्या बाहेर झोपले होते. दरम्यान, चोरटे त्याठिकाणी चोरी करण्यासाठी आले असता, त्यांनी महिलेच्या हातावर काठी मारली. यावेळी महिलेने चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी परत येऊन पाहिल्यानंतर विष्णू जाधव हे काहीच बोलले नाहीत. त्यामुळे त्यांना पाटाेदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, शवविच्छेदन केले असता त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा डॉक्टरांनी अहवाल दिला आहे. मात्र, चोरट्यांच्या झटापटीत मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे, तर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तपासाला गती देण्यात आली असून, लवकरच धागेदोरे लागतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि वैशाली पेटकर करीत आहेत.
घटना घडल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक विजय लगारे व पाटोदा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, बोटांचे ठसे घेतले असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तपासासाठी पथकदेखील नेमण्यात आले आहे. श्वानपथकाकडे श्वान नसल्यामुळे त्यांना पाचारण करता आले नाही.
तपासात सर्व निष्पन्न होईल
घटना घडल्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान, नागरिक सांगत असेलेले मृत्यूचे कारण व शवविच्छेदन अहवाल यात साम्य नसल्यामुळे वृद्धाचा मृत्यू नेमका कसा झाला हे स्पष्ट नाही. मात्र, तपासात सर्व निष्पन्न होईल
- विजय लगारे, पोलीस उपअधीक्षक, आष्टी विभाग