महायुतीचे नवे-जुने कार्यकर्ते, नेते मंडळी नमिता मुंदडा यांच्या प्रचारात झाली सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:45 PM2019-10-09T23:45:01+5:302019-10-09T23:47:05+5:30
केज विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारासाठी भाजपाचे नवे व जुने कार्यकर्ते एकत्रित येऊन प्रचाराला लागले आहेत. शहरी व ग्रामीण भागात डोअर-टूृ-डोअर प्रचार यंत्रणा सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाला वाढता पाठिंबा मिळू लागला आहे.
अविनाश मुडेगावकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : केज विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारासाठी भाजपाचे नवे व जुने कार्यकर्ते एकत्रित येऊन प्रचाराला लागले आहेत. शहरी व ग्रामीण भागात डोअर-टूृ-डोअर प्रचार यंत्रणा सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाला वाढता पाठिंबा मिळू लागला आहे.
केज विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमिता अक्षय मुंदडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची प्रचारयंत्रणा सक्रिय झाली असून जोमाने कामाला लागली आहे. अंबाजोगाई शहर, केज, नेकनूर व ग्रामीण भागात भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे संचालक अशी मोठी यंत्रणा प्रचारात उतरली आहे.
मुंदडा कुटुंबिय गेल्या ३० वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहे. कै. डॉ. विमल मुंदडा यांनी सलग २५ वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महिला व बाल विकास मंत्री, अशा विविध खात्यांच्या मंत्री म्हणून त्यांनी मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट केला. त्यांच्या अकाली निधनामुळे मुंदडा परिवार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहिला. आता पुन्हा नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून मुंदडा परिवाराने केज मतदार ंसंघात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा हे सातत्याने जनतेच्या सुख-दु:खात सहभागी असतात. याची मोठी सहानुभूती मुंदडा परिवाराच्या पाठिशी आहे. या शिवाय बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, यांचे पाठबळ पुन्हा मुंदडा कुटुंबियांच्या पाठीशी भक्कम उभे राहिल्याने ही मुंदडासाठी भक्कम जमेची बाजू आहे, अशी चर्चा मतदारसंघातून ऐकावयास मिळत आहे.
मुंदडा परिवाराचा राजकीय पिंड हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखा आहे. सत्तेत असताना आणि नसतानाही या परिवारात कधी अहंकार पहावयास मिळाला नाही. सर्वसामान्यांच्या सुखदु:खात ते नेहमीच सहभागी झाले, अशी प्रतिक्रियाही ऐकावयास मिळत आहे.