लग्नानंतर १३ व्या दिवशीच नवविवाहितने ठोकली धूम; रोकड अन् दागिनेही केले लंपास
By सोमनाथ खताळ | Published: May 17, 2023 07:12 PM2023-05-17T19:12:22+5:302023-05-17T19:15:18+5:30
वडिलांनी मुलीला नांदविण्यासाठी पाठविणार नाहीत, असे सांगितल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले
बीड : विवाह संस्थेच्या माध्यमातून विवाह केल्यानंतर अवघे १३ दिवस संसार केला. पती व सासू शेतात जाताच या नवविवाहितेने मुंबईला धुम ठोकली. यावेळी दोघांच्या अंगावरील चार तोळे सोने आणि घरात ठेवलेले रोख ७० हजार रूपयेही लंपास केले. ही घटना डिसेंबर २०२२ मध्ये बीडमध्ये घडली. १६ मे रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पत्नीसह चौघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन किरण उबाळे (वय ३२ रा.बीड) यांना भारत मेट्रोमनी विवाह संस्थेकडून वारंवार फोन येत होते. त्यामुळे त्यांनी १५ जून २०२२ रोजी अडीच हजार रूपये शुल्क भरून नोंदणी केली. त्यांना आशा नावाच्या मुलीचा नंबर आणि बायोडाटा देण्यात आला. दोघांचे फोनवर बोलून ओळख झाली. त्यानंतर ९ डिसेंबर २०२२ रोजी आळंदी येथे दोघांचा विवाह झाला. त्यानंतर दोघेही बीड शहरातील राष्ट्रवादी भवनसमोर किरायाच्या घरात राहू लागले. २२ डिसेंबर २०२२ रोजी नितीन व त्यांची आई शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. याचवेळी आशाचे आई, वडील व भाऊ बीडला आले. कोणालाही कल्पना न देताच तिला मुंबईला माहेरी घेऊन गेले. शेतातून परत आल्यावर नितीनला आशा घरात दिसली नाही. त्यामुळे त्याने कॉल केला असता तिच्या वडिलांनी उचलला. आता आम्ही आमच्या मुलीला नांदविण्यासाठी बीडला पाठविणार नाहीत, असे सांगितले. यावर नितीन यांना आपली फसवूणक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी पत्नी आशा नितीन उबाळे, सासरा थोराजी गंगथडे, सासू सविता गंगथडे व मेहुणा शिवाजी गंगथडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अगोदर २ लाख नंतर दागिने घेऊन पसार
विवाह करण्यापूर्वी आशाच्या वडिलांनी नितीनकडून दोन लाख रूपये घेतले होते. विवाह झाल्यानंतर आशाने घरातील रोख ७० हजार रूपये आणि नितीन व स्वता:च्या अंगावरील जवळपास चार तोळे सोने घेऊन ती पसार झाली आहे.