गावाला जोडणारा पूल नदीच्या पुरात वाहून गेला; त्यावरून येणाऱ्या वृद्धाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 11:48 AM2022-07-06T11:48:44+5:302022-07-06T11:50:03+5:30
मुसळधार पावसामुळे गावाजवळील नदीला पूर आलेला आहे.
माजलगाव ( बीड ): मुसळधार पावसामुळे गुजरवाडीजवळील सरस्वती नदीला पूर आल्याने अचानक पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत गावाकडे परतणाऱ्या एका वृद्धाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. बाबूराव रामकिसन नरवडे ( ६०, रा.गुजरवाडी ) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
गेल्या दोन दिवसांपासून परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाने गावालगचे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. मंगळवारी देखील सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यात जोरदार पाऊस झाला. गुजरवाडी येथील बाबुराव नरवडे काही कामानिमित्त पात्रुड येथे आले असता पावसामुळे अडकून पडले. सात वाजेपर्यंत पाऊस थोडा कमी झाला. त्यामुळे बाबुराव पात्रुड येथून चालत गावाकडे निघाले.
दरम्यान, गुजरवाडीजवळ असलेल्या सरस्वती नदीला मुसळधार पावसाने पूर आला होता. नदीवर एक जुना पूल आहे. त्यापुलावरून पाणी वाहत होते. बाबुराव यांनी धाडस करत पुलावरील पाण्यातून वाट काढली. मात्र, अचानक पूल कोसळल्याने बाबुराव नदीत पडले. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने काही कळायच्या आत बाबुराव पुढे वाहत गेले.
दरम्यान, गावातील एकाने बाबुराव वाहून जात असल्याचे पाहिले. त्याने याची माहिती गावात दिली आणि शोधकार्य सुरु केले. मात्र, अंधारामुळे शोधकार्यात अडथळा आला. आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बाबुराव यांचा मृतदेह कोसळलेल्या पुलापासून काही अंतरावर सापडला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त व्यक्त होत आहे.