वर्षभरातून एकदाच महिलांसाठी उघडतात 'या' मंदिराचे दरवाजे !
By Admin | Published: November 14, 2016 11:50 AM2016-11-14T11:50:18+5:302016-11-14T11:54:49+5:30
पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील कार्तिक स्वामींचे राज्यातील आद्य मंदिर म्हणून उल्लेख होणा-या प्राचीन मंदिराचे दरवाजे महिलांसाठी वर्षभरातून एकदाच कार्तिकी पौर्णिमेला उघडतात.
>- प्रताप नलावडे, ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १४ - कार्तिक स्वामींचे राज्यातील आद्य मंदिर म्हणून उल्लेख होत असलेल्या पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील प्राचीन मंदिराचे दरवाजे वर्षभरातून केवळ एकच दिवस महिलांसाठी उघडतात. सोमवारी (आज) कार्तिकी पोर्णिमेच्या निमित्ताने दिवसभर महिलांना मंदिर खुले असून मराठवाड्यातून महिला भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असल्याची माहिती अश्वलिंग संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. मधुकर महाराज यांनी दिली.
वर्षभर या मंदिरात विविध धार्मिक सोहळे सुरू असले तरी महिलांना मात्र वर्षभरातून एकदाच दर्शन घेता येते. प्राचीन परंपरेनुसार कार्तिक स्वामीच्या जन्म सोहळ्याच्या म्हणजे कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात येतो. रात्री उशीरापर्यंत दर्शन घेता येते. वर्षभरातून एकदाच होणा-या या सोहळ्यासाठी मराठवाड्यातून भाविक महिला येथे येतात. बीड पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आणि कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावर हे मंदिर आहे.
पिंपळवंडी येथील कार्तिक स्वामीचे हे मंदिर आठशे वर्षापूर्वीचे असून अश्वलिंग संस्थानचे गंगाभारती महाराज यांनी मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते. कार्तिक स्वामीची मुर्ती सहा मुखांची असून प्राचीन मुर्तीची झीज झाली असल्याने गतवर्षी अशीच सहा मुखाची आणि मयुरावर बसलेल्या मुर्तीची संस्थानच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जुनी मूर्ती पाषाणाची असून तिची उंची दोन फूट आहे. सहा मुखाची ही मूर्ती मयुरावर बसलेली आहे. नव्याने तयार केलेल्या मूर्तीची उंची चार फुटाची असून या दोन्ही मूर्ती एकाच ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.
सांगण्यात येणा-या आख्यायिकेप्रमाणे, कार्तिक स्वामी हे सन्यस्थ वृत्तीचे होते आणि त्यामुळे महिलांना त्यांचे दर्शन घेता येत नसे. आई पार्वतीने त्यांना तुझ्या जन्मदिवसाच्या दिवशी तरी किमान महिलांना दर्शन दे, असे सांगितल्यानंतर त्यांनी ते मान्य केले. त्यामुळे वर्षभरातून एकदा महिलांना त्यांच्या मंदिरात प्रवेश दिला जातो. संस्थानच्या वतीने नाथ सष्टीला कार्तिक स्वामींची पालखी पैठणला नेली जाते. चैत्र महिन्यात शिव-सती विवाहाच्या तिथीच्या मुहूर्तावर मंदिरातही मोठा उत्सव साजरा केला जातो.
कार्तिक महिन्यातील पोर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र जेव्हा एकत्र येतात, त्यावेळी कार्तिक स्वामीच्या दर्शनाचा काळ भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक स्वामी हे बल, बुध्दी आणि साहस याचे प्रतीक मानले जातात.