माजलगाव स्वीटमार्ट तोडफोड प्रकरणात एक आरोपी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 05:26 PM2017-12-19T17:26:06+5:302017-12-19T17:28:34+5:30
शहरात दोन दिवसांपूर्वी स्वीटमार्ट तोडफोड प्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
माजलगाव (बीड) : शहरात दोन दिवसांपूर्वी स्वीटमार्ट तोडफोड प्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
शनिवारी रात्री आंबेडकर चौक व ठक्कर बाजार येथे दोन स्वीटमार्टवर दहा ते बारा युवकांनी हल्ला केला होता. यात दुकानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. तसेच दोघाजणांना गंभीर दुखापत देखील झाली होती. या प्रकरणी सोमवारी व्यापा-यांनी व राजकीय पक्षांनी आरोपींच्या त्वरित अटकेच्या मागणीसाठी शहर बंद ठेवले होते. यानंतर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान काल याप्रकरणात एका आरोपीच्या सहभागाची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी रात्री उशिरा एका आरोपीला फुलेनगर येथून अटक केली. त्याने गुन्हाची कबुली दिली असून पोलीस इतर आरोपींच्या शोधात आहेत.
मित्राने दिली माहिती
घटनेच्या वेळी अटक झालेल्या आरोपीचा मित्र घटनास्थळा जवळच होता. त्याने आरोपीस तेथून वेगाने पळत जाताना पाहिले होते. पळताना त्याच्या तोंडावरील कपडा बाजूला झाल्याने त्याला आरोपीची ओळख पटली. आरोपीने केलेलं कृत्य चुकीचे असल्याने सदसदविवेकबुद्धीने विचार करत त्याने पोलिसांना याची माहिती दिली. हाच धागा पकडत पोलिसांनी कारवाई केली.
दोन मुख्य सूत्रधार
या अटकेची माहिती देताना पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांनी सांगितले कि, या प्रकरणात दोन मुख्य आरोपी आहेत. अटकेतील आरोपीच्या माहितीवरून आम्ही त्यांच्या मागावर आहोत. पुढील दोन दिवसात सर्व आरोपी ताब्यात घेऊ. आरोपीला पकडण्यात पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांच्या सह ए. यस. आय. सुभाष शेटे, विजय घोडके, विनायक अंकुशे, किशोर राऊत , अमोल सोनवणे आदींचा समावेश होता.