जुगार अड्ड्यावरील धाडीमध्ये साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:10 AM2019-09-06T00:10:20+5:302019-09-06T00:10:46+5:30
परळी तालुक्यातील टोकवाडी येथील कला केंद्राच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये काहीजण तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्यावर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकली.
बीड : परळी तालुक्यातील टोकवाडी येथील कला केंद्राच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये काहीजण तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्यावर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकली. यावेळी १५ जणांकडून साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून कलाकेंद्राच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये जुगाऱ्यांनी आपला अड्डा केला होता. या संदर्भात पोलिसांना खबºयामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार परळीचे पोलीस उप अधीक्षक राहुल धस, पो. उप नि. चाँद मेंढके, हेड कॉ. बांगर, पो. ना. केंद्रे, पो. कॉ. हरगावकर यांच्यासह इतर दोन पंचांना बोलावून दुपारी २.३० वाजता छापा मारला. यावेळी पोलिसांनी सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार मोटारसायकल, कार जप्त केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमाव करुन तिर्रट नावाचा जुगार खेळला जात होता. याप्रकरणी किशोर हरिभाऊ तांदळे, हनुमंत वाल्मिक गीते, रंगनाथ दगडूबा शिंदे, भानुदास माणिक मुंडे, राजेश हरिश्चंद्र घायाळ, गोविंद गोपीनाथ मुंडे, कडाजी श्रीरंग कडबाने, नवनाथ तुकाराम कदम, राजाराम माणिक लांडगे, अविनाश नारायण लगसकर, मदन भगवानराव कराड, श्रीकृष्ण कोंडिबा बोडले, जगदीश गोविंदराव मुंडे, रोहित सुनील पुजारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.