रेखाकलेच्या विद्यार्थ्यांचा दीड टक्का राहणार सहीसलामत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:11+5:302021-04-07T04:34:11+5:30
बीड : इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रेखाकलेचे गुण मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे या कलागुणांच्या आधारे मिळणारा ...
बीड : इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रेखाकलेचे गुण मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे या कलागुणांच्या आधारे मिळणारा विद्यार्थ्यांच्या हक्काचा दीड टक्का सहीसलामत राहण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
२०१९ नंतर एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी मिळणाऱ्या गुणांचा दहावीच्या परीक्षेत लाभ होणार की नाही असा संभ्रम होता. एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिल्या, त्यांना सवलत मिळणार नसल्याने पालकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना होती. कलागुणांचे मार्क मिळावेत असा सूर कलाध्यापक ,विद्यार्थी, पालकांमधून उमटत होता.
यातच उच्च व तंत्रशिक्षण विभागाला चुकीचे मार्गदर्शन करण्यात आल्याने २६ मार्च रोजी शासनाने अध्यादेश काढून यावर्षी दहावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचे वाढीव गुण दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. याला महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने आक्षेप घेतला होता. तसेच राज्यभरातील सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी होळी निषेध आंदोलनही झाले. त्यानंतर तंत्रशिक्षण मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत दहावीच्या विद्यार्थ्यांना कलेचे वाढीव गुण दिले जाणार असल्याचे सांगितले. दहावीतील ज्या विद्यार्थ्यांनी दुसरी रेखाकला परीक्षा (इंटरमिजिएट) दिली नाही, त्यांना मेमध्ये परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असून, प्रमाणपत्र वेळेवर मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांत समाधान व्यक्त होत आहे.
या क्षेत्रात मोजकीच मुले रमलेली असतात. त्यांचे नुकसान होऊ नये. स्पर्धेमुळे पाॅइंट पाॅइंट गुणासाठी पालक आग्रही असतात. पुढील शिक्षणासाठी या प्रमाणपत्रांचा उपयोग होतो. म्हणून गुण द्यायला पाहिजेत. पालकांचा संभ्रम दूर करून शासनाने न्याय द्यावा, असा आमचा आग्रह होता. आता परीक्षा सुरळीत व्हाव्यात व मुलांना गुण मिळावेत.
- रमेश जाधव, मराठवाडा सहकार्यवाह, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे संलग्न बीड जिल्हा.
----------
सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांनी या आधी कोणतीही ग्रेडची एक परीक्षा दिली असेल, तर त्या आधारे दुसऱ्या परीक्षेचे गुण द्यावे असे आमचे मत होते. मात्र, आता शासनाने ही परीक्षा घेणार असल्याचे सूचित केले आहे. अखेर शासनाने ही परीक्षा घेण्याचे स्पष्ट केल्याने त्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
- सुजित गिराम, चित्रकला शिक्षक शिवाजी विद्यालय.
----
मी रेखाकलेच्या दोन्ही परीक्षा दिल्या होत्या. मात्र, दहावीच्या परीक्षेत यंदा हे गुण मिळणार नाही, असे जाहीर झाले होते. कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा, रेखाकला परीक्षा झाल्या नाहीत, त्याला आम्ही विद्यार्थी जबाबदार कसे? आमच्या कलागुणांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा होती.
- अक्षदा काळे, इयत्ता दहावी.
-----------
दहावीची परीक्षा आयुष्यातले पहिले वळण असते. जास्तीत जास्त मार्क मिळावे म्हणून अभ्यासासोबत जोपासलेल्या कलागुणांचे मार्क मिळावेत ही अपेक्षा असते. यंदा हे गुण मिळणार नाही, असे समजल्यानंतर आम्ही निराश झालो, परंतु आता गुण मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा आम्हाला गुणांचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.
- प्रणाली मार्गे, इयत्ता दहावी.
--------
२०१९ मध्ये रेखाकला परीक्षेला जिल्ह्यातून बसलेले विद्यार्थी ८०००
रेखाकला परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी ७२००
रेखाकलेचे गुण मिळालेले विद्यार्थी ६८००
-------------