पहिल्या टप्प्यातील दीड हजार कोरोना योद्ध्यांचे झाले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:37 AM2021-03-01T04:37:45+5:302021-03-01T04:37:45+5:30
हेल्थ वर्करसह फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी घेतली कोविड लस माजलगाव : तालुक्यात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाचा चौथा आठवडा ...
हेल्थ वर्करसह फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी घेतली कोविड लस
माजलगाव
: तालुक्यात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाचा चौथा आठवडा उलटला असून, दीड हजार कोरोना योद्ध्यांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान, हेल्थ वर्करसह फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोविड लस घेतली आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणीकृत कोरोना योद्धांच्या लसीकरणाच्या उद्दिष्टांपैकी केवळ २१० कोरोना योद्ध्यांचे लसीकरण बाकी असल्याची माहिती डॉ. मधुकर घुबडे यांनी दिली.
२५ जानेवारी रोजी माजलगाव तालुक्यात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्यविषयक राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून निश्चित करण्यात आलेल्या १ हजार ७६३ कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर होते. यात आजघडीला १५५३ कोरोना योद्ध्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित २१० कोरोना योद्ध्यांचे लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घुबडे यांनी दिली. लसीकरणासाठी हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाइन वर्कर्स असे दोन गट केले होते.
हेल्थ वर्कर गट
शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी
फ्रंटलाइन वर्कर्स गट
नगर परिषद, तहसील, पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि पोलीस कर्मचारी
एकूण लसीकरण
दरम्यान आरोग्य कर्मचारी-८२, गटप्रवर्तक -५, आशाताई -१६०, अंगणवाडी कर्मचारी-४२५, शिक्षक-३०,पंचायत समिती कर्मचारी-४१६, तहसील कर्मचारी -७२, नगर परिषद -४५ तर पोलीस दलातील १४८ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली.