बीडच्या जलदुताने पत्नीचे दागिने विकून बोअरवेल घेतला अन् ५ गावांना मोफत पाणी वाटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:56 IST2025-04-22T11:52:16+5:302025-04-22T11:56:00+5:30
Jaldut Rajesh Kakade Beed: बीडच्या जलदुताचा निर्धार! ग्रामस्थांना पाण्यासाठी एक बोअरवेल कमी पडला, लगेच पत्नीचे दागिने विकून दूसरा घेतला

बीडच्या जलदुताने पत्नीचे दागिने विकून बोअरवेल घेतला अन् ५ गावांना मोफत पाणी वाटलं
- सोमनाथ खताळ
बीड : सामाजिक बांधिलकी जाेपासत बीड तालुक्यातील जरूड येथील राजेश रामचंद्र काकडे हे छोट्या-मोठ्या पाच गावांना मोफत पाणी पुरवठा करत आहेत. एका बोअरवर ताण येत असल्याने दुसरा बोअर घेतला. परंतू त्याला खर्च येत असल्याने त्यांनी पत्नी पुजा हिच्या अंगावरील दागिने विकले. काकडे यांची 'जलदूत' म्हणून ओळख झाली आहे.
राजेश कराड यांना तीन एकर जमिन. त्यात डाळींबाचे ३०० झाडे, एक एकर ऊस आणि बाजरीचे पीक घेतले. २०१४ पासून ते गावात पाणी पुरवठा करत होते. परंतू २०२४ मध्ये पाण्याची मागणी वाढल्याने काही लोकांना पाणी देता येत नसल्याने ते चिंतेत होते. दुसरा बोअर आणि मोटार बसविण्यासाठी साधारण दीड लाख रूपये खर्च येत होता. परिस्थिती हालाकिची असल्याने त्यांनी पत्नी पुजा यांच्या अंगावरील दागिने (नेकलेस व झुंबर) विक्री केले. याच पैशातून बोअर घेतला आणि त्याला पाणीही भरपूर लागले. प्रत्येक उन्हाळ्यात ते शेतात कसलेही पीक न घेता पाणी वाटप करतात. २०२४ मध्ये त्यांनी ऊस व बाग मोडून मोफत पाणी पुरवठा कला.
रोज २० हजार लिटर पाणी वाटप
लाईट आली की दोन्ही बोअर सुरू केले जातात. २४ तासांत साधारण २० हजार लिटर पाणी वाटप केले जाते. तसेच २ हजार लिटरच्या ८ टाक्या असून त्या कायम स्टॉक म्हणून वापरल्या जातात. लाईट गेली की लोक टाकीतील पाणी नेतात.
तलावातील पाणी नको
जरूड गावाला तलावातून पाणी पुरवठा होतो. योजनाही कार्यान्वित आहे. परंतू पाणी पिण्यायोग्य नसल्याने लोक काकडे यांच्याच बोअरने तहान भागवतात. जरूडसह शिवणी फाटा, बाभूळखुट्टा, खुट्टेवाडी, शिवणी फाटा आदी ठिकाणी सध्या पाणी पुरवठा होत आहे.
कार्यक्रम असल्यास घरपोच सेवा
या गावांमध्ये कोणाचाही सुख-दु:खाचा कार्यक्रम असला की राजेश काकडे घर पोहच पाणी पुरवठा करतात. यासाठी ट्रॅक्टर संबंधितांकडून घेतले जाते. यात्रेतही जे व्यावसायिक बाहेर गावाहतून येतात, त्यांना जागेवर पाणी वाटप केले जाते.
२०१४ साली दुष्काळ पडला आणि लोकांचे हाल पहावेले नाहीत. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. २०२४ साली पत्नीचे दागिने विक्री करून बोअर घेतला. आज सर्वांना मोफत पाणी वाटप करतो, याचा आनंद वाटतो.
- राजेश काकडे, जलदूत, जरूड, ता.बीड