८०९ कामगारांना एक कोटींची दिवाळी बोहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:31 AM2019-10-28T00:31:23+5:302019-10-28T00:32:54+5:30
जिल्ह्यातील ८०९ कामगारांना दिवाळी सणानिमित्त बोहणी, पगारी रजेचे १ कोटी १ लाख ७ हजार ६३३ रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील ८०९ कामगारांनादिवाळी सणानिमित्त बोहणी, पगारी रजेचे १ कोटी १ लाख ७ हजार ६३३ रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आले असून श्रमिकांची दिवाळी गोड झाली आहे.
महाराष्टÑ शासनाच्या कामगार विभाग अंतर्गत जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळामार्फत वेतन घेत असलेल्या नोंदणीकृत कामगारांना दिवाळी सणासाठी दिवाळी बोहणी वाटप करण्याबाबत कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक कामगार आयुक्त तथा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष एस. जी. मुंडे यांनी निर्णय घेतला. त्यानुसार मंडळाचे सचिव एस. पी. राजपूत यांनी दिवाळी बोहणी वाटपाची कार्यवाही केली.
बीड, माजलगाव व अंबाजोगाई येथील मोंढा, बॅटको ट्रान्सपोर्ट, बीड एस. टी. पार्सल विभाग, वखार महामंडळ, बीड, अंबाजोगाई, परळी येथील बियाणे महामंडळ, परळी येथील रेल्वे स्थानकातील माल धक्का तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामातील कार्यरत नोंदणीकृत श्रमजीवी कामगारांचा लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे. बोनसची रक्कम वाटप करण्यासाठी मंडळाचे लेखापाल ए. डी. सपकाळ, पी. ए. कुरेशी, एम. व्ही. गायकवाड यांनी परिश्रम घेतले. दिवाळीआधीच कामगारांना बोनसची रक्कम मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात असून, याचा बाजारपेठेलाही आधार झाला.
जिल्हाभरातील कष्टकरी आनंदले
जिल्ह्यातील बीड केंद्रात १७२, माजलगाव ७२, अंबाजोगाई ३६, वखार महामंडळ परळी ९७, परळी रेल्वे धक्का १५१, शसकीय गोदाम परळी १५, केज १६, एस. टी. बीड ७, गेवराई, तलवाडा, दिंद्रूड, सिरसाळा, पाटोदा, उमापूर, धारुर, चिंचवण, कडा येथील सरकारी गोदामातील ७५, किराणा बाजारातील १३, घाटनांदूर, आष्टी, शिरुर, नेकनूर, चौसाळा, युसूफ वडगाव, पिंपळनेर, मादळमोही येथील ५५ व इतर ठिकाणचे असे एकूण ८०९ कामगार नोंदणीकृत आहेत.
जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाकडील नोंदणीकृत ८०९ कामगारांना १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील वेतनावर दिवाळी सणानिमित्त १ कोटी १ लाख ७ हजार ६३३ रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.