परळीत राडा! जुन्या वादातून तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 20:07 IST2023-06-22T20:06:37+5:302023-06-22T20:07:09+5:30
बरकतनगर रोडवर आज दुपारी दोन कुटुंबात अचानक वाद उफाळून आला.

परळीत राडा! जुन्या वादातून तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू
परळी: शहरातील बरकतनगर रोडवर जुन्या भांडणाच्या कारणावरून जोरदार हाणामारीची घटना आज दुपारी घडली. या हाणामारीत नागापूर येथील रहिवासी शेख अलाउद्दीन यांचा मृत्यू झाला.
कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. परंतु प्रत्यक्षात मात्र तिघाजणांमध्येच भांडण झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीसअधिकारी, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व इतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
जुना वाद ठरला जीवघेणा
बरकतनगर रोडवर आज दुपारी दोन कुटुंबात अचानक वाद उफाळून आला. वाद मारामारीपर्यंत पोहचला. यात एकाचा मृत्यू झाला. मृत अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी पानटपरी चालक आहेत. बरकतनगरमध्ये एका लग्न समारंभासाठी नागापूर येथील नातेवाईक आले होते. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद उफाळून आल्याची माहिती आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
नागापूर येथील दोन कुटुंबात असलेल्या खाजगी कारणावरून वाद झाला. याचा आणि लग्नाचा किंवा दोन गटाचा कसलाही संबंध नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.
- सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक, संभाजीनगरपोलीस स्टेशन, परळी वैजनाथ