दर्ग्याची शंभर एकर जमीन बळकावली, सहा जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:37 AM2021-09-05T04:37:30+5:302021-09-05T04:37:30+5:30
कडा/आष्टी : तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्ग्याची शंभर एकर जमीन बनावट संमतीपत्राआधारे बळकावल्याचा धक्कादायक ...
कडा/आष्टी : तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्ग्याची शंभर एकर जमीन बनावट संमतीपत्राआधारे बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी ३ सप्टेंबर रोजी आष्टी ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा नोंद झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
रुईनालकोल येथील दस्तगीर महमंद शेख महंमद बाबा दर्गा या देवस्थानाच्या सेवेसाठी खिदमत मास म्हणून शंभर एकर जमीन शेख दस्तगीर महंमद यांना प्रदान करण्यात आलेली आहे. शेख कुटुंबीयांकडे ही जमीन वडिलोपार्जित आहे. शेख बाबूलाल, शेख महंमद, शेख हजरत, शेख रशीद, शेख निजाम, शेख दस्तगीर, शेख गुलाब असे मिळून जमिनीची देखभाल करतात. दरम्यान,
गोपीनाथ पांडुरंग बोडखे, शेख मुस्ताक बादशाहा पानसरे, सुरेश गहिनीनाथ बोडखे, आजिनाथ त्र्यंबक बोडखे, संजय भाऊसाहेब नालकोल व शरद नानाभाऊ पवार यांनी संगनमत करून खोटे, बनावट व बोगस कागदपत्र तयार केले. शेख महमंद बाबा दर्गा देवस्थानाचे नाव ७/१२ अभिलेखात कब्जेदार रकान्यातून देवस्थानाचे नाव कमी करून तसेच स्वत:चे नाव लावून शंभर एकर जमिनीचा अपहार केला. ही बाब २०२० मध्ये लक्षात आल्यानंतर शेख दस्तगीर महंमद यांनी तहसीलदार, मंडळधिकारी, तलाठी, जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून तक्रार केली. शिवाय जिल्हा वक्फ बोर्ड याना व पोलीस विभागाला अर्ज दिले. त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणात जिल्हाधिकारी, भूसुधार सामान्य विभाग यांच्याकडेही तक्रार अर्ज केले. त्यानंतर सुनावणी सुरू झाली, त्यात ही बोगसगिरी चव्हाट्यावर आली.
....
शंभर रुपयांच्या बाँडवर बोगस शपथपत्र
अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण सुरू असताना १७ ऑक्टोबर २०१७ ते २०२० या कालावधीत शंभर रुपयांच्या बाँडवर बनावट संमतीपत्र तयार करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दस्तगीर महंमद शेख यांनी आष्टी ठाण्यात ३ सप्टेंबर रोजी तक्रार दिली. त्यावरून आजिनाथ त्र्यंबक बोडखे, सुरेश गहिनीनाथ बोडखे, गोपीनाथ पांडुरंग बोडखे (सर्व रा. आनंदवाडी), शेख मुस्ताक बादशाह पानसरे, संजय भाऊसाहेब नालकोल, शरद नानाभाऊ पवार यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
....