पोलिस भरतीसाठी एक इंच उंची कमी; मग डोक्याला चिकटवला खिळा

By सोमनाथ खताळ | Published: July 2, 2024 11:52 AM2024-07-02T11:52:21+5:302024-07-02T11:52:35+5:30

बीडमधील प्रकार, उमेदवाराला भरती प्रक्रियेतून केले अपात्र

One inch less height for police recruits; Then stick a nail to the head | पोलिस भरतीसाठी एक इंच उंची कमी; मग डोक्याला चिकटवला खिळा

पोलिस भरतीसाठी एक इंच उंची कमी; मग डोक्याला चिकटवला खिळा

बीड :पोलिस भरतीत केवळ एक इंच उंची कमी भरत होती. मग, उमेदवाराने शक्कल लढवत चक्क डोक्याला खिळा चिकटवून उंची वाढविल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. या उमेदवाराला पोलिसांनी अपात्र ठरवत भरती प्रक्रियेतून बाहेर काढले.

बीडमध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक आणि पोलिस शिपाई बँड्समॅन यांच्या १७० पदांसाठी पोलिस मुख्यालयावर १९ जूनपासून भरती सुरू आहे. बीडसह राज्यातील ८ हजार ४२९ उमेदवारांनी यासाठी अर्ज भरले होते. १ जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाच वाजताच सर्व उमेदवारांना पोलिस मुख्यालयात घेण्यात आले. त्यांची सर्व शारीरिक चाचणी केली जात होती.

बीडमधीलच एका उमेदवाराची उंची तपासली जात असताना एका कर्मचाऱ्याने डोक्याला हात लावला. त्यांना डोक्यात जाड वस्तू लागली. त्यांनी त्या उमेदवाराकडे विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. जास्त केस वाढलेले असल्याने वरून काहीही समजत नव्हते. अखेर या उमेदवाराला बाजूला घेत त्याचे केस बाजूला करत तपासणी केल्यावर त्याने एक इंच उंचीचा खिळा केसांच्या आतून फेवि क्विकने चिकटवला होता. यामुळे त्याची उंची भरती योग्य होणार होती. परंतु, पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा फसवणुकीचा प्रकार अपयशी ठरला. या उमेदवाराला पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर सर्व माहिती घेऊन त्याला प्रक्रियेतूनच अपात्र ठरविण्यात आले.

या अगोदर एका तरुणावर गुन्हा
या अगोदरही एका तरुणाने धावण्यासाठी शक्ती वाढविणारे औषध बॅगमध्ये आणले होते. त्याच्यासोबत इंजेक्शनही सापडले होते. पोलिसांनी ते जप्त करून दोन दिवस चौकशी केली. सर्व अहवाल आल्यावर या तरुणाविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा दुसरा प्रकार घडला आहे. परंतु, या प्रकरणात अपात्र ठरविले असून, गुन्हा दाखल केला नाही.

अपात्र ठरवले

एका उमेदवाराने उंची वाढवण्यासाठी डोक्यात केसांच्या आतून खिळा चिकटवला होता. परंतु, आमच्या कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून हा प्रकार उघड झाला. संबंधित तरुणाला भरती प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात आले.
- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक बीड

Web Title: One inch less height for police recruits; Then stick a nail to the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.