२५ लाखांच्या लॉटरीचे आमिष दाखवून एक लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:37+5:302021-03-15T04:29:37+5:30
बीड : ‘केबीसी’ची २५ लाखांची लाॅटरी लागल्याचे भासवून भामट्यांनी बीडच्या एका तरुणाला १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा गंडा ...
बीड : ‘केबीसी’ची २५ लाखांची लाॅटरी लागल्याचे भासवून भामट्यांनी बीडच्या एका तरुणाला १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून, याप्रकरणी १३ मार्चला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली असून, केबीसीच्या नावे एसएमएस आणि काॅल करून फसवणुकीची नवी पद्धत या भामट्यांकडून अवलंबिली जात आहे. रोहित प्रकाश राठोड (रा. जोडतांडा, माजलगाव ह. मु. शाहूनगर, बीड) या १८ वर्षीय तरुणाला १० मार्च रोजी रात्री अज्ञात भामट्याने काॅल करून केबीसीचा मॅनेजर असल्याची बतावणी केली आणि तुम्हाला २५ लाखांची लाॅटरी लागल्याचे सांगितले. रोहितकडून विविध कागदपत्रे जमा करून घेण्यात आली. त्यानंतर जीएसटी, तिकीट, खाते काढणे अशी विविध कारणे सांगून रोहितकडून १ लाख १२ हजार ५०० रुपये उकळण्यात आले. सोमवारी खात्यावर लाॅटरीचे पैसे जमा होतील असे सांगितले. त्यानंतर भामट्यांनी फोन रिसिव्ह करणे बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे रोहितच्या लक्षात आले. याप्रकरणी रोहितच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे हे करीत आहेत.