उसने दिलेली लाखोंची रक्कम बुडाल्याने एकाची आत्महत्या; सात जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:38 AM2018-10-20T00:38:35+5:302018-10-20T00:39:03+5:30
परिचयातील व्यक्तींना विविध कामासाठी उसनी दिलेली लाखोंची रक्कम परत देण्यास त्यांनी नकार दिल्याने निराश झालेल्या शिरूर घाट येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सात जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा केज पोलिसात नोंदविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : परिचयातील व्यक्तींना विविध कामासाठी उसनी दिलेली लाखोंची रक्कम परत देण्यास त्यांनी नकार दिल्याने निराश झालेल्या शिरूर घाट येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सात जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा केज पोलिसात नोंदविण्यात आला आहे.
केज तालुक्यातील शिरूर घाट येथील सुंदर तांबडे यांनी गावातील अनेकांना उसने पैसे दिलेले होते. परंतु, लातूर येथे ठेवलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना पैशांची गरज भासू लागली. त्यामुळे ११ आॅक्टोबर रोजी गावातील नारायण देवा लोंढे याच्याकडे जमिनीच्या व्यवहारातील बाकी राहिलेली साडेतीन लाखांची रक्कम मागितली. परंतु, नारायण लोंढे याने पैसे देण्यास साफ नकार दिला आणि शिवीगाळ करून तांबडे दांपत्याला हाकलून दिले.
त्यानंतर अशोक उत्तम गायकवाड याला दवाखान्यासाठी उसने दिलेली चार लाखांची रक्कम परत मागितली. परंतु गायकवाड याने पैसे देणार नाही असे सांगत पुन्हा पैसे मागितलेस तर अॅट्रॉसिटी करीन अशी धमकी दिली. बानेगाव येथील सिद्धू चंदू मोराळे यालाही तांबडे यांनी उसने पाच लाख रुपये दिले होते. त्याच्याकडेही मागणी केली असता त्यानेही सुंदर तांबडे यांना पैसे न देता बाहेरचा रस्ता दाखविला. यामुळे हताश झालेले तांबडे दांपत्य गावाकडे परतले आणि रात्रीच्या वेळी भावाच्या घरी थांबले.
लोकांनी माझे पैसे बुडविल्याने मला आता मरणाशिवाय पर्याय नाही, अशी खंत सुंदर तांबडे यांनी कुटुंबियांसमोर बोलून दाखविली. कुटुंबियांनी त्यांची कशीबशी समजूत घातली.
यानंतरही १२ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास सुंदर यांनी शेतातील घरात जाऊन गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, दोर तुटल्याने ते जमिनीवर पडले. बेशुद्धावस्थेतील सुंदर यांना कुटुंबियांनी उपचारासाठी आधी बीड आणि नंतर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ९.४० वाजता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असे सुंदर यांची पत्नी मनीषा तांबडे यांनी केज पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांना मिळाली मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी
दरम्यानच्या काळात सुंदर यांनी मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असता त्यात वरील तिन्ही आरोपी सोबत जय लोंढे, सुधाकर घोडके, अंकुश झुंबर मोराळे आणि बालू मोराळे (फौजी) या चौघांनीही पैसे बुडविल्याचा उल्लेख आहे. परंतु, या चौघांनी पैसे घेतले होते किंवा नाही याबाबत माहिती नसल्याचे देखील मनीषा तांबडे यांच्या फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सातही आरोपींवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.