सौरऊर्जा प्रकल्पातील भीषण स्फोटात एक कामगार ठार, दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 10:58 AM2019-07-26T10:58:29+5:302019-07-26T10:58:37+5:30
सौरऊर्जा प्रकल्पात बिघाड दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन एक कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाले.
माजलगाव: धारूर तालुक्यातील चाटगाव येथील एका सौरऊर्जा प्रकल्पात बिघाड दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन एक कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास झाला. जखमी झालेल्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. धारूर तालुक्यात चाटगाव येथे ‘तुल्य तुलाई सोलार प्रोजेक्ट’ नामक सौरऊर्जा प्रकल्प आहे. शुक्रवारी पहाटे या प्रकल्पात अचानक बिघाड झाला. त्यामुळे जयराज जया बालन (वय २७), रामानंद रामरतन खारवाल (वय २३) आणि संपत कमलाकर शिंदे (वय २३, रा. सिरसाळा) हे तिघे कामगार दुरुस्ती करण्यासाठी तिथे गेले होते.
दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात जयराज बालन १०० टक्के तर इतर दोघे ५० टक्के भाजले गंभीर भाजले. त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता तिथे उपचारादरम्यान जयराज बालन याचा मृत्यू झाला. तर शिंदे आणि खारवाल यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही.