एका वर्षात डिझेल ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी महागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:35 AM2021-05-19T04:35:05+5:302021-05-19T04:35:05+5:30
बीड : इंधन दराचा भडका उडत असल्याने सर्वसामान्यांच्या जीवनमानावर त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत आहे. मागील वर्षीपासून ...
बीड : इंधन दराचा भडका उडत असल्याने सर्वसामान्यांच्या जीवनमानावर त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत आहे. मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, तर कोरोनाशी झगडण्यात सर्वसामान्यांचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. यातच डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक दरात वाढ होऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तर दैनंदिन जीवनात सर्वच घटकांना लागणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात मागील आठ महिन्यांपासून भडका उडला आहे. परिणामी घरचे किचन बजेट पार कोलमडले आहे. एका वर्षात डिझेलचे भाव ३० टक्के तर किराणा मालाचे दर ४० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे घर चालविणे अनेकांना कठीण होऊन बसले आहे. ऑक्टोबरपासून खाद्यतेलाचे दर वाढतच राहिले. त्यामुळे भर दिवाळीत महागडे तेल खरेदी करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली. त्यानंतरही तेलाचे दर वाढतच राहिले. कोरोनामुळे लग्नसराई, सप्ताह, मोठे कार्यक्रम बंद आहेत. मात्र, दैनंदिन मागणी घटलेली नाही. सूर्यफूल तेलाचे भाव येत्या तीन महिन्यात लीटरमागे २०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे, तर सोयाबीन तेलाचे दरही त्याच दिशेने वाढत आहेत. आयातीवर तेलाचे भाव अवलंबून असल्याने ही दरवाढ सुरूच असल्याचे सांगण्यात येते, तर एकीकडे पेट्रोल दराने शंभरी गाठली आहे. डिझेलचे दरही त्याच दिशेने जात आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लीटरमागे केवळ १० रुपयांचा फरक उरला आहे. -----------
ही दरवाढ कोरोनामुळे नसून सरकारी धोरणांमुळे आहे. खाद्यतेलाच्या बाबतीत परदेशावर अवलंबून राहावे लागते. त्यावरील आयातशुल्क कमी केल्यास खाद्यतेलाचे दर कमी होऊ शकतात व नियंत्रणात राहतील. डिझेलच्या दरवाढीमुळे साहजिकच वाहतूक दर वाढले आहेत. त्याचा परिणाम महागाईवर झाला आहे. देशांतर्गत उत्पादनांमध्ये फार वाढ झालेली नाही, साखरेचे दर वर्षभरापासून स्थिर आहेत. - गंगाबिशन करवा
-------
किराणा दर मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१
तूरडाळ ९५ १०० ११०
हरभरा डाळ ६० ६५ ७५
तांदूळ ६५ ७० ७५
साखर ३५ ३५ ३५
गुळ ३२ ३६ ४०
बेसन ८० ९० १००
मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१
शेंगदाणा तेल १४० १६५ १८५
सूर्यफुल तेल ११५ १२५ १८०
करडी तेल १६० १८० २००
सोयाबीन तेल ९५ ११५ १४५
पामतेल
डिझेल दराचा ग्राफ (भाव प्रतिलीटर)
जानेवारी २०२० जून २०२० जानेवारी २०२१ मे २०२१
६७.१० ७६.७० ८१.०५ ९०.३४
--------
सर्वसामान्य लोकांना महागाई वाढलेली परवडत नाही. चांगला आहार घ्या, असे म्हणतात. पण, किराणा मालाचे भाव वाढले आहेत. अत्यावश्यक असणारे तेल, डाळींच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे. -संगीता सपकाळ, गृहिणी, बीड.
-----------
लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेचा कामधंदा बंद आहे. आर्थिक अडचणी वाढलेल्या आहेत. अशा काळातच किराणा मालाची भाववाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सामान्य माणसाला कोरोनापेक्षा महागाईचे टेन्शन वाढले आहे. सरकारने भाव कमी करण्यासाठी उपाययोजना करावी.
दुष्यंता रामटेके, गृहिणी, बीड.
------------