परळी-पूस-बर्दापूर राज्य रस्त्याचे चालू काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:33 AM2021-05-14T04:33:02+5:302021-05-14T04:33:02+5:30
परळी : परळी-पूस-बर्दापूर या राज्य रस्त्याच्या कामासाठी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुमारे ६७ कोटींचा ...
परळी : परळी-पूस-बर्दापूर या राज्य रस्त्याच्या कामासाठी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुमारे ६७ कोटींचा निधी मंजूर करून आणला. त्यानुसार संबंधित एजनसीने काम सुरू केले. पंरतु ते काम लॉकडाऊन लागल्यामुळे जवळ पास एक महिन्यापासून ठप्प आहे. नंदागौळसह पूस, जवळगाव, बर्दापूर व लगतच्या अनेक गावाच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रुंदीकरण, मजबूतीकरण, सिमेंट रस्ता, डांबरीकरण व इतर वेगवेगळ्या प्रकारचे काम करण्यासाठी ई-निविदेद्वारे, औरंगाबादच्या एका कन्स्ट्रक्शन एजंसीला कंत्राट मिळाले असून त्याचा कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात काम केले आहे. परंतु सध्या कामबंद असल्यामुळे नंदागौळमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. पुढे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्याचे काम करताना अडथळा तर निर्माण होईलच परंतु त्याचबरोबर पडलेले मोठ मोठे खड्डे,अनेक ठिकाणी रस्ता उखडल्यामुळे होणारा चिखल यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होऊन अपघातसुद्धा होऊ शकतात. युवक कार्यकर्ते सुंदर गित्ते म्हणाले, रस्त्याचे काम तत्काळ सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. हे बंद असलेले काम सुरू करण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा कार्यकारी अभियंता एन.टी. पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. परंतु काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे परळी-पूस-बर्दापूर या राज्य रस्त्याचे बंद असलेले काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित एजन्सीला द्यावेत व काम सुरू करावे, असे निवेदन कार्यकारी अभियंता एन.टी. पाटील यांना सुंदर गित्ते, सिद्धेश्वर मुंडे व धनराज गित्ते यांनी दिले. जर तत्काळ काम सुरू नाही झाले तर कार्यालयासमोर २० मे रोजी सकाळी ठीक ११ वाजता गावकऱ्यांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
------
लवकरच काम सुरू होईल
परळी-पूस-बर्दापूर या राज्य रस्त्याचे काम सुरू झाले होते. सध्या लॉकडाऊनमुळे एजन्सीने काम बंद ठेवले आहे. संबंधित एजन्सीला काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच काम सुरू करण्यात येईल.- एन.टी. पाटील, कार्यकारी अभियंता, अंबाजोगाई