कांदा ६० रुपये; अद्रक, लसणाचाही तडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:17 AM2019-09-23T00:17:20+5:302019-09-23T00:17:47+5:30
भाजी बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी वाढल्याने कांद्याचे दर तिपटीने वधारले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील भाजी बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी वाढल्याने कांद्याचे दर तिपटीने वधारले आहेत. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ५० ते ६० रुपये किलो विकला जात आहे. एकीकडे कांदा डोळ्यात पाणी आणत असतानाच दुसरीकडे आले आणि लसणाने शंभरी पार केली आहे.
येथील भाजी आडत बाजारात कांद्याचे दर ३० ते ३५ रुपये किलो आहेत. ५० किलोच्या गोणीत किमान १० किलो कांदा ओला असल्याने खराब होतो. तसेच वाहतूक व इतर खर्च पाहता किरकोळ विक्रेत्यांकडून ५० ते ६० रुपये किलो कांदा विकला जात आहे.
सध्या ठोक बाजारात शेवगा ३० ते ४० रुपये किलो विकला जात आहे. गवार २० रुपये किलो आहे. भेंडी १५ ते २० रुपये किलो आहे. फ्लॉवरच्या दरात दोन दिवसात तेजी आली आहे. पानकोबी १२ ते १७ रुपये किलो आहे. हिरवी मिरची १२ ते १५ रुपये किलो विकली जात आहे.
शिमला मिरचीचे दर १० ते १५ रुपये किलो आहेत. टोमॅटो २० ते २५ रुपये किलो आहेत. वांगीची आवक कमी असून चांगल्या प्रतीच्या वांगीचे २० किलोचे कॅरेट ३०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे.
बटाटे मात्र १० ते १५ रुपये किलोपर्यंत आहे. कोथिंबीर ३०० ते ६०० रुपये शेकडा, मेथी जुडी ५०० ते ८०० रुपये शेकडा भाव आहेत. ठोक बाजारातील या दरांनुसार किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे भाव ठरत आहेत.
ग्रामीण भागातून अनेक शेतकरी भाजी विक्रसाठी येतात. मुबलक आवकमुळे लवकरात लवकर विकण्याची स्पर्धा असल्याने ग्रामहकांना वाजवी दरात भाज्या खरेदी करता येत आहेत.