एसटीचे ऑनलाइन बुकिंग अनेकांना ठाऊकच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:09+5:302021-08-26T04:35:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना घरबसल्या जागा आरक्षित करता यावी, यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना घरबसल्या जागा आरक्षित करता यावी, यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू केली. परंतु, जनजागृतीअभावी त्याची बहुतांश लोकांना माहितीच नसल्याचे समोर आले आहे. त्यातच मागील दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्याने बसेस जाग्यावरच होत्या. त्यामुळे प्रवाशांनीही आता ऑनलाइन नोंदणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात आठ आगार असून जवळपास २० स्थानके व नियंत्रण कक्ष आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी ५४० बस असल्या, तरी कोरोनामुळे अद्यापही १०० पेक्षा जास्त बसेस आगारातच आहेत. मागील काही दिवसांपासून बसेसलाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच प्रवाशांना अधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने घरबसल्या तिकीट बुक करून आसनांचे आरक्षण करता यावे, यासाठी ऑनलाइन सुविधा कार्यान्वित केलेली आहे. परंतु, याची ठरावीक लोकांनाच माहिती आहे. सामान्य प्रवाशांना याची कसलीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. ही माहिती सर्वांपर्यंत पोहाेचविण्यासाठी पोस्टर व ऑडिओ क्लिपद्वारे जनजागृती करण्याची गरज आहे. रापमने यासाठी योग्य नियोजन करून जनजागृती करावी, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.
---
...असे करा ऑनलाइन बुकिंग
एमएसआरटीसी ऑनलाइन रिझर्व्हेशन या वेबसाइटवर जावे. तेथे जाऊन मार्ग निश्चित करावा. सर्व तिकिटांची रक्कम अगोदरच पूर्ण भरावी लागते. त्यानंतरच आपल्याला एक मेसेज येईल. तोच मेसेज बसमध्ये बसल्यावर वाहकाला दाखवावा. तसेच रेड बझ या ॲपद्वारेही ऑनलाइन रिझर्व्हेशन करता येऊ शकते.
---
ऑनलाइन रिझर्व्हेशन सुरू आहे. रेड बझ आणि एमएसआरटीसी ऑनलाइन रिझर्व्हेशन येथे जाऊन नोंदणी करता येऊ शकते. ऑनलाइन नोंदणी केलेल्या प्रवाशांची नोंदणी आपल्याकडे नाही.
- एन. पवार, आगारप्रमुख, बीड