ऑनलाइन शिक्षण अन् मोबाइलने लावला मुलांना चष्मा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:33+5:302021-07-22T04:21:33+5:30
बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लहान मुले आणि युवकांच्या डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे शाळा बंद होत्या, ...
बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लहान मुले आणि युवकांच्या डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे शाळा बंद होत्या, ऑनलाइन अभ्यास सुरू होता. त्यामुळे मुलांसमोर मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉपचा पर्याय होता. मात्र, त्यांना स्क्रीन टाइम वाढल्याने डोळ्यांना आणि डोकेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे ऑनलाइन शिक्षण आणि मोबाइलचा अतिवापर यामुळे अनेक मुलांना चष्मा लागला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचा सल्ला नेत्रतज्ज्ञ देत आहेत. मागील काही महिन्यांत लहान मुलांमध्ये डोळ्यांचे आजार, डोकेदुखी वाढण्याची लक्षणे दिसून आली आहेत. जवळपास ५ टक्के मुलांमध्ये डोळ्यांच्या त्रासाची लक्षणे दिसून आली आहेत.
१) डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून
अँटी ग्लेयर किंवा ब्ल्यू ब्लॉक चष्मा वापरावा
संगणक स्क्रीनवर अँटी ग्लेयर ग्लास बसवावी
प्रत्येक ऑनलाइन तासिकेनंतर डोळे बंद ठेवून थोडा आराम द्यावा
डोळ्यांचा व्यायाम करावा. स्क्रीनवर अधिक वेळ घालवू नये.
पुस्तके १२ ते १५ इंच लांब धरावे.
२) लहान मुलांना हे धोके
सतत मोबाइल आणि संगणक वापरल्याने लहान मुलांना दृष्टीचे अनेक धोके आहेत. चिडचिडेपणा वाढत आहे. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाचा आजार लहान मुलांमध्ये बळावत आहे. डोळे लाल होणे, पाणी येणे, डोळे दुखणे अंधुक दिसणे, डोके दुखणे अशी लक्षणे आहेत. चष्म्याचा नंबर वाढण्याचाही धोका आहे.
३) लहान मुलांमध्येही डोकेदुखी वाढली
१) संगणक आणि मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येण्याचे प्रकार वाढत आहेत.
२) मैदानी खेळ कमी आणि मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये अधिक वेळ चालल्याने डोळ्यांवर परिणाम होतो.
३) स्क्रीन टाइम कमी करावा, सकस आहार घ्यावा. फास्टफूड टाळावे, पालेभाज्या खाव्यात.
पालकही चिंतित
ऑनलाइनमुळे मुलांच्या हाती मोबाइल असताना अभ्यासाशिवाय इतर ॲपवर ते खेळतात. यातून डोके दुखण्याची तक्रार वाढली. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला. चष्माही लागला. - सुशील कासट, बीड.
ऑनलाइन शिक्षण व मोबाइल, टीव्हीच्या अतिपाहण्यामुळे डोळे दुखण्याचे प्रमाण वाढत आहे. खरे तर ऑनलाइनवर्ग नसावेच, चालू ठेवायचे असतील तर वेळ कमी असावा.
- सचिन लातूरकर, बीड.
--------
मोबाइल, संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्यांना विश्रांती मिळत नाही. ताण पडतो. फूड, घरचे जेवण कमी करणे, हेल्दी फूड न खाणे, फळे, भाज्या कमी खाण्यामुळे मुले थकतात. हे टाळण्यासाठी दररोज सकाळी डोळ्यांची उघडझाप, असा सूक्ष्म व्यायाम २५ वेळा करावा. संगणकावर काम करताना ब्रेक घ्यावा. चेहरा धुऊन घ्यावा, पाणी सेवन जास्त करावे.
- डॉ. राधेश्याम जाजू, नेत्रतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, बीड.