आणखी दोघांची ऑनलाइन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:41 AM2021-09-10T04:41:02+5:302021-09-10T04:41:02+5:30
बीड : जिल्ह्यातील आणखी दोघे सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकले. अंबाजोगाईत ॲप डाऊनलोड करायला सांगून ३२ हजार रुपयांचा गंडा घातला, ...
बीड : जिल्ह्यातील आणखी दोघे सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकले. अंबाजोगाईत ॲप डाऊनलोड करायला सांगून ३२ हजार रुपयांचा गंडा घातला, तर मांजरसुंबा (ता.बीड) येथे केबीसीच्या २५ लाखांच्या लॉटरीचे आमिष दाखवून ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ९ सप्टेंबर रोजी उघडकीस आला.
आकाश शिवाजी सिरसाट (रा.हनुमान नगर, अंबाजोगाई) हा तरुण खासगी नोकरी करतो. २७ जुलै रोजी त्याने ऑनलाइन ट्रान्जेक्शन केले. मात्र, व्यवहार पूर्ण न झाल्याने ५०० रुपये अडकले. त्यामुळे त्याने गुगलवर जाऊन एसबीआय कस्टमर केअरला संपर्क केला. त्यानंतर काही वेळाने त्यास भामट्याने कॉल करून एनी डेक्स हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून ॲप डाऊनलोड करताच गोपनीय माहिती घेऊन भामट्याने खात्यातून ३२ हजार ९९९ रुपये गायब केले. याप्रकरणी शहर ठाण्यात ८ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. दुसऱ्या घटनेत मांजरसुंबा (ता.बीड) येथे मयूर दत्तात्रय रसाळ यास भामट्याने कॉल करून केबीसीतून बोलताेय, तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे. लॉटरीची रक्कम जमा करण्यासाठी प्रोसेसिंग शुल्क म्हणून एका खात्यात ४१ हजार रुपये भरण्यास सांगितले. पैसे जमा केल्यावर २५ लाख रुपये आलेच नाहीत. त्यामुळे दत्तात्रय सुदामराव रसाळ यांच्या तक्रारीवरून दोन मोबाइलधारकांवर नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
...
गोपनीय माहिती देऊ नका
ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अनोळखी लोकांना खात्याविषयी गाेपनीय माहिती देऊ नये. गुगलवरील कस्टमर केअर क्रमांक बनावट असतात. याआधारेदेखील फसवणूक होते. त्यामुळे नागरिकांची सतर्कता महत्त्वाची असून खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर सेलचे पोलीस निरीक्षक आर.एस. गायकवाड यांनी केले आहे.
...