बीड पासपोर्ट केंद्रात पहिल्या २५ जणांची आॅनलाईन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:18 AM2018-03-26T00:18:44+5:302018-03-26T00:18:44+5:30
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंजूर झालेल्या व येत्या आठवड्यात सुरु होणाऱ्या येथील पोस्ट आॅफीस पासपोर्ट सेवा केंद्रात २९ मार्चसाठी २५ जणांची नोंदणी कन्फर्म झाली आहे. आता पासपोर्टची वेबसाईट २६ मार्च रोजी दुपारी सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंजूर झालेल्या व येत्या आठवड्यात सुरु होणाऱ्या येथील पोस्ट आॅफीस पासपोर्ट सेवा केंद्रात २९ मार्चसाठी २५ जणांची नोंदणी कन्फर्म झाली आहे. आता पासपोर्टची वेबसाईट २६ मार्च रोजी दुपारी सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बीड येथे पासपोर्ट कार्यालय व्हावे म्हणून मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. हे कार्यालय सुरु करण्यासाठी जागेची विचारणा झाल्यानंतर टपाल विभागाने जागा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी पाठपुरावा करत बीड सेवाकेंद्रासह इतर ठिकाणचेही प्रश्न मार्गी लावले. २९ मार्च रोजी बीड येथे या सेवाकेंद्राचे कामकाज सुरु होत आहे. त्याअनुषंगाने २५ अर्जदारांनी शासनाच्या पासपोर्ट इंडिया. गव्ह. इन या संकेतस्थळावर लॉगिन आयडी प्राप्त करुन कॅटेगरीनुसार आॅनलाईन अर्ज व त्याचे शुल्क भरले. त्यांच्यासाठी २९ तारीख तसेच वेळ निश्चित केली आहे.
मात्र तत्काळ पासपोर्ट साठी सोलापूर व पुणे येथील पासपोर्ट सेवा केंद्रांवरच जावे लागणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह ३ हजार ५०० रुपये शुल्क भरल्यानंतर एका दिवसात हे पासपोर्ट मिळण्याची सुविधा आहे.
बीड येथील पासपोर्ट सेवा केंद्रात २ समन्वयक तसेच ६ अधिकारी, कर्मचारी कार्यरत राहतील. एका दिवशी २५ जणांचा कोटा असेल अशी शक्यता आहे. पासपोर्ट सेवाकेंद्र सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी २५ नोंदणीकृत अर्जदारांची तीन टप्प्यात चौकशी व तपासणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.