ऑनलाइन नोंदणीमुळे ज्येष्ठ नागरिक झाले हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:33+5:302021-05-07T04:35:33+5:30
गेवराई : शासनाने कोविड प्रतिबंधक लस जवळपासच्या कोणत्याही केंद्रावर घेण्याची मुभा दिल्याने गेवराई शहरातील व परिसरातील नागरिक ऑनलाइन ...
गेवराई : शासनाने कोविड प्रतिबंधक लस जवळपासच्या कोणत्याही केंद्रावर घेण्याची मुभा दिल्याने गेवराई शहरातील व परिसरातील नागरिक ऑनलाइन नोंदणी करताना निपाणी जवळका केंद्राची निवड करीत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना व ज्येष्ठांना लस घेणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे त्यांना भर उन्हात रांगेत ताटकळावे लागत आहे.
मागील दोन महिन्यांपासून निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना व ४५ वर्षांपुढील व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. त्यापैकी बरेच नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर येत आहेत; परंतु गेवराई येथील नागरिक तिथे लस घेण्यासाठी येत असल्यामुळे स्थानिक विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना लस घेणे आता अडचणीचे झाले आहे. कारण लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करताना निपाणी जवळका केंद्राची निवड करीत आहेत. त्यांच्या नावाने लस आरक्षित झाल्याने प्रथम त्यांना देण्यात येत आहे व उर्वरित लस स्थानिकांना देण्यात येत आहे. यामध्ये असंख्य ज्येष्ठ नागरिकांना अँड्रॉइड मोबाइल हाताळता येत नसल्यामुळे लोकेशन ट्रेस करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्रावरून त्यांना परत जावे लागत आहे. या कारणाने त्यांच्यात कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. पूर्वी केंद्रावर त्यांच्या नावाचे रजिस्ट्रेशन करून दिले जात होते, परंतु आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लस कशी घ्यावी हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. शासनाने स्थानिक पातळीवर याबाबत उपाययोजना करून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.
गेवराई शहरापेक्षा निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्राला नागरिकांची पसंती आहे. कारण शहरांमधील गर्दीपेक्षा निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्र नागरिकांना सुरक्षित वाटत आहे.
===Photopath===
060521\06_2_bed_14_06052021_14.jpg
===Caption===
vaccination