मांजरा धरणात फक्त १७ टक्के पाण्याचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:22+5:302021-07-17T04:26:22+5:30

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : सर्वत्र धो धो पाऊस पडतो आहे. मात्र, बीड, लातूर आणि उस्मानाबाद धरणाची तहान भागवणाऱ्या मांजरा ...

Only 17% water storage in Manjara dam | मांजरा धरणात फक्त १७ टक्के पाण्याचा साठा

मांजरा धरणात फक्त १७ टक्के पाण्याचा साठा

Next

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : सर्वत्र धो धो पाऊस पडतो आहे. मात्र, बीड, लातूर आणि उस्मानाबाद धरणाची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात सध्या फक्त जिवंत पाण्याचा साठा १७ टक्के एवढाच आहे. असे असले तरी यावर्षीही मांजरा धरण भरेल आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी याही वर्षी दरवाजे उघडावे लागतील, असा विश्वास या परिसरातील नागरिकांना आहे.

मराठवाड्यातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील जवळपास १२० गावांची तहान भागवण्याचे काम मांजरा धरण गेली अनेक वर्षांपासून करत आहे.

मांजरा धरणाच्या निर्मितीनंतर प्रथमच २०१६ साली मे महिन्यांपासून जुलै महिन्यापर्यंत मांजरा धरणाचा तळ उघडा पडला होता. त्यानंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे मांजरा धरण भरले होते. त्यानंतर सातत्याने या धरणात भरपूर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

गेल्या दहा वर्षांच्या एकूण पर्जन्यमानाच्या सरासरीपेक्षा साधारण: ११० टक्के पाऊस पडण्याचे भाकीत राज्यातील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यावर्षी जून महिन्यात झालेल्या पावसातच विष्णूपुरी या मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले होते. या आठवड्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे विष्णूपु्री धरणाचे सात दरवाजे उघडावे लागले असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मांजरा धरणात मात्र आज पुरेसा साठा शिल्लक नाही, ही वस्तुस्थिती आहे.

यासंदर्भात मांजरा धरणातील पाणी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मांजरा धरणावर निगराणी ठेवण्यासाठी शासननियुक्त शाखा अभियंता शाहुराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मांजरा धरणात आज फक्त १७ टक्केच जिवंत पाण्याचा साठा उपलब्ध आहे. मांजरा धरणाची उंची ६४२.३७ मीटर एवढी असून, धरणात सध्या ६३७.४६ मीटर लेवलपर्यंतच पाणीसाठा शिल्लक आहे. धरण भरण्यास ४.९१ मीटर उंचीचे पात्र अजून शिल्लक आहे.

धरणाची पाणी साठवण क्षमता २२४.०९३ एमसीएमएम एवढी असून, धरणात फक्त ७७.२२८ एमसीयुएम एवढा पाणीसाठा जमा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून १४६.८६५ एमसीयुएम पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. धरणातील उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवनाचे प्रमाण सध्या ५.० एमएम एवढे आहे. धरणक्षेत्रात १५ जुलै रोजी ४ एमएमएवढा पाऊस पडला आहे. नदीच्या पात्रातून धरण क्षेत्रात येणारे पाणी शून्य असल्याची नोंद १५ जुलै रोजीच्या अहवालात आहे.

मांजरा धरणात आज फक्त १७ टक्के जिवंत पाणीसाठा असला तरी आगामी काळात होणाऱ्या मोठ्या पावसाने या पाणीसाठ्यात वाढ होईल आणि मांजरा धरण याही वर्षी पूर्ण क्षमतेने भरून नदीपात्रातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी मांजरा धरणाचे दरवाजे उघडावे लागतील, असा विश्वास या विभागातील नागरिकांना वाटत आहे.

160721\fb_img_1603433460204.jpg

मांजरा धरण संग्रहित फोटो

Web Title: Only 17% water storage in Manjara dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.