अतिवृष्टीत केवळ २५६ गावे बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:35 AM2021-09-03T04:35:56+5:302021-09-03T04:35:56+5:30
बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. याचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ...
बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. याचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी व महसूल विभागाला दिले होते. यात केवळ २५६ गावांत नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. यात सहा तालुक्यातील एकाही गावात नुकसान झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नुकसानीत गेवराई तालुक्यातील १८३ व बीड तालुक्यातील ५३ गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. यामध्ये गेवराई तालुक्यातील १८३, बीडमधील ५३ तर आष्टी तालुक्यातील सहा, वडवणी ११ व धारूर तालुक्यातील एका गावात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तर, परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव, शिरूर, आष्टी, पाटोदा या तालुक्यात एकाही गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. हा प्राथमिक अंदाज असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुन्हा महसूल व कृषी विभाग संयुक्त जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
एक लाख २५ हजार ९० शेतकऱ्यांचे नुकसान
कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात २५६ गावांमधील एक लाख २५ हजार ९० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर ९४ हजार हेक्टरवरील पिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये सर्व क्षेत्र हे जिरायती असून, १५८५ हेक्टरील फळबागांचे नुकसान झाले झाल्याचे अहवालात नमूद आहे.