गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये फक्त 28 प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 01:28 PM2020-12-12T13:28:38+5:302020-12-12T13:35:33+5:30
अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते.
- प्रभात बुडूख
बीड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे १० डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत १११ शेतकरी अपघात प्रकरणे पाठवण्यात आली होती. मात्र, त्यापैकी फक्त २८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे इतर ७० प्रस्ताव रखडले आहेत.
शेतात काम करत असताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ता अपघात,वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्याचा मृत्यू होतो. तसेच अपंगत्व येते, घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. या अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. यासाठी मागील वर्षात जिल्ह्यातून १११ प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठवण्यात आले. त्यानुसार कृषी विभागाने जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.नागपूर व दि युनिव्हर्सल सोम्पा जनरल इंन्शुनरंन्स कंपनी ली. याकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, वर्ष उलटून देखील यामधील फक्त २८ प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत तर २ प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. यापैकी ११ प्रस्तावांमध्ये त्रुटीत आहेत. तर ७० प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. असे जवळपास ८१ प्रस्ताव विमा कंपनीच्या हलर्गीपणामुळे रखडलेले आहेत. यामुळे शासनाने विमा उतरवलेला असताना देखील अपघातग्रस्त शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित आहेत.
यांना आहे विमा संरक्षण
या योजनेसाठी १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्ष वयोगाटातील दोघांना या अपघाती विमा योजना लाभ घेता येतो. दरम्यान या योजनाचा कालावधी ९ डिसेंबर २०२० रोजी संपला असला तरी १ मार्चपर्यंत म्हणजे ३ महिने अपघात विमा योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची सुट शेतकऱ्यांना आहे.
विम्यापोटी कंपनीस दिले ९८ कोटी
राज्यातील शेतकरी व कुटुंबातील वहितीधारक खातेदार शेतकऱ्याच्या विमा संरक्षणापोटी शासनाने कंपनी व विमा सल्लागार कंपनीत रक्कम भरलेली आहे. त्यामध्ये राज्यातील ३.०४ कोटी शेतकरी, कुटुंबातील सदस्यांच्या विम्यापोटी दि युनिव्हर्सल जनरल इन्शुरंन्स कंपनी लि. व जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. या कंपनीत ९८ कोटी ५ लाख ८३४ रुपये भरलेले आहेत. मात्र, त्या तुलनेत शेतकऱ्यांना लाभ देण्याचे प्रमाण मात्र अत्याल्प आहे.
विमा लाभ मिळण्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पत्रव्यावहार देखील करण्यात आला आहे. त्यानुसार विम्याचा लाभ लवकर मिळेल असा विश्वास आहे. - एस.एम साळवे, जिल्हा कृषी अधीक्षक (प्रभारी)