२ वर्षात २९ पैकी केवळ ६ हजार नळ जोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 10:57 PM2020-03-03T22:57:25+5:302020-03-03T22:57:52+5:30
शहरात ११४ कोटी रूपयांची अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून केले जात आहे. याच योजनेंतर्गत शहरात नवीन नळ जोडण्या दिल्या जात आहेत.
बीड : शहरात ११४ कोटी रूपयांची अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून केले जात आहे. याच योजनेंतर्गत शहरात नवीन नळ जोडण्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत दोन वर्षांत २९ हजारांपैकी केवळ ५ हजार ९५० कनेक्शनच देण्यात आले आहेत. यावरून हे काम संथ गतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
अमृत पाणी पुरवठा योजनेस १९ एप्रिल २०१७ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. ११४ कोटी ६३ लाख रूपयांची ही योजना आहे. या निधीत केंद्र शासनाचा ५० आणि राज्य व नगर पालिकेचा २५ टक्के वाटा आहे. या कामाचा जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत झालेल्या नवीन जलवाहिनीला नवीन नळ जोडण्या दिल्या जात आहेत. परंतु याचे काम मजिप्रा कडून संथ गतीने सुरू आहे. सुरूवातीला दोन वर्षांत हे काम करण्याचे आदेश होते. नंतर याला एक वर्षांची मुदतवाढ देऊनही कामात गती आलेली नाही. मागील दोन ते अडीच वर्षांत केवळ ६ हजारच नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. अद्यापही २३ हजार नळ जोडण्या देणे बाकी आहेत.
दरम्यान, पालिकेकडून वारंवार पत्र देऊन कामाच्या गतीबाबत कळविलेले आहे. तसेच जिल्हाधिकारी व आयुक्तांसोबतही यावर चर्चा झालेली आहे. परंतु कारवाईत सुधारणा झालेली नाही. शुक्रवारीही याच कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्य अभियंता व नगर पालिका अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचे सांगण्यात आले आहे. यात मजिप्राच्या अधिकाºयांना कामाच्या संथ गतीबाबत चांगलेच धारेवर धरले होते. १५ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सुचनाही जिल्हाधिक-यांनी केल्या आहेत.
१० वेळा संपर्क करूनही प्रतिसाद नाही
याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता अमोल पाटील यांच्याशी १० वेळा भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. परंतु त्यांनी एकदाही प्रतिसाद दिला नाही. तसेच उप अभियंता गौरव चक्के यांनाही तीन वेळा संपर्क केला, त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे मजिप्राची बाजू समजली नाही. यापूर्वीही संपर्क केल्यानंतर येथील अधिका-यांकडून बाजू मांडण्यास टाळाटाळ केली होती.
जिल्हाधिकारी यांच्यासोबत मजिप्रा अधिका-यांची बैठक झाली आहे. काम संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे. काम गतीने करून पूर्ण करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे. परंतु मजिप्राकडून याला प्रतिसाद दिला जात नाही.
- डॉ.भारतभूषण क्षीरसागर
नगराध्यक्ष, नगर परिषद बीड