केवळ घोषणांचा आधार, निराधारांना एक हजाराची मदत कधी मिळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:51+5:302021-05-07T04:35:51+5:30
बीड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर निराधारांचे हाल ...
बीड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर निराधारांचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाच्या वतीने प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास २ लाख २४ हजार ६४३ लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र, अद्याप लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शासनाकडून तत्काळ लाभ द्यावा, अशी मागणी निराधारांतून केली जात आहे.
केद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त पद्धतीने निराधारांना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये दिले जातात. यातच राज्य शासनाकडून कोरोना पार्श्वभूमीवर अधिकचे एक हजार रुपये खात्यावर देण्याची घोषणा केली. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या पाच योजनेचे जवळपास दोन लाख २४ हजार ६४३ लाभार्थी आहेत. राज्य शासनाच्या या घोषणेमुळे या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला. मात्र, घोषणा करून देखील अद्याप मदत मिळाली नाही. घोषणा केल्याप्रमाणे शासनाने १ हजाराची मदत तत्काळ करावी अशी मागणी होत आहे.
कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन देखील वाढविण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. त्यामुळे निराधारांना पैसे मिळाले नसल्यामुळे ते हतबल झाले आहेत.
कोरोनामुळे सतत लॉकडाऊन होत आहे. त्यामुळे आम्हाला कामही मिळत नाही. आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परस्थितीत राज्य शासनाने एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र, मदत लवकरात देण्यात आली नाही.
धोंडाबाई कांबळे
.............
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे हाताला काम नाही. पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे गरिबांची उपासमार होत आहे. राज्य शासनाने एक हजार रुपये देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले; पण पैसे कधी मिळणार हे माहिती नाही.
-राजेंद्र गालफाडे
......
शेतातील कामेदेखील संपली आहेत. अशातच लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. मोफत धान्य दिले तरी इतर साहित्य पैसे देऊनच खरेदी करावे लागते. त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे एक हजाराची मदत देण्यात यावी.
-लिंबा काळे
............
राज्य शासनाकडून संकटाच्या काळात आम्हाला जी एक हजार रुपयांची मदत देऊ केली आहे, ती तोकडी आहे. परंतु ,घोषणा करूनदेखील अद्याप बॅंक खात्यात पैसे आले नाहीत. ते देण्यात यावेत.
आनंद मुळे
...................
निराधारांना आधार देण्यासाठी राज्य शासनाकडून मदतीची घोषणा दिलासादायक आहे. मात्र, शासनाकडून फक्त घोषणा केल्याचे दिसून येत आहे. मदत खात्यावर लवकरात लवकर जमा करावी.
- लोचना खंडागळे
...
संजय गांधी निराधार योजना - ५०२९८
श्रावणबाळ योजना १४४२६७
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना -२८९७५
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना ७७३
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना ३३०
निराधारांना देण्यात येणारी एक हजार रुपयांची मदत शासनस्तरावर प्रलंबित आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे यासंदर्भात नागरिकांनी दिलेले निवेदन पाठविण्यात आलेले आहेत.
संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड