समाजाची मानसिकता बदलली तरच राजकारणात बदल : भिडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:01 AM2018-01-22T00:01:47+5:302018-01-22T00:01:57+5:30
भविष्यात सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही ही संवेदनशीलता महत्वाची आहे. समाजातील मानसिकता बदलत नाही तोपर्यंत राजकारणात बदल होणार नाही. समाजातील स्त्रियांप्रमाणेच महिला पत्रकारांची स्थिती आहे. ओवरप्रोटेक्टिव्ह किंवा त्यांना काय येतं? म्हणून संबोधले जाते. त्यामुळे महिला पत्रकारांनी स्वत:ला सिद्ध केले तर त्यांनाही या क्षेत्रात वाव आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भविष्यात सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही ही संवेदनशीलता महत्वाची आहे. समाजातील मानसिकता बदलत नाही तोपर्यंत राजकारणात बदल होणार नाही. समाजातील स्त्रियांप्रमाणेच महिला पत्रकारांची स्थिती आहे. ओवरप्रोटेक्टिव्ह किंवा त्यांना काय येतं? म्हणून संबोधले जाते. त्यामुळे महिला पत्रकारांनी स्वत:ला सिद्ध केले तर त्यांनाही या क्षेत्रात वाव आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी केले.
लेखिका साहित्य संमेलनात रविवारी सकाळी पहिल्या सत्रात राही भिडे यांची प्रकट मुलाखत पत्रकार शामल गरुड, शर्मिष्ठा भोसले, अॅड. मंजुषा दराडे यांनी घेतली. महिला पत्रकारांच्या संदर्भात ‘द हूट’ व ‘द वायर’ या संस्थांच्या सर्वेक्षणात ४५ टक्के महिलांना नकारात्मक अनुभव आले. त्यामुळे महिला पत्रकारांत असुरिक्षततेची भावना आहे काय? यावर उत्तर देताना भिडे म्हणाल्या. अव्यक्त ५५ टक्के महिलांचेही तेच मत आहे, समाजव्यवस्था पुरुषप्रधान आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्याचा प्रभाव आहे.
महिलांना संधी मिळाल्यास त्यादेखील ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून देतील. महिला पत्रकारांनी अतिधाडस न करता योग्य ती काळजी घेतली तर काहीच नाही. बाल व महिलांच्या लैंगिक अत्याचाराकडे महिला पत्रकार अधिक संवेदनशीलपणे पाहू शकतात असे त्या म्हणाल्या. निर्भया किंवा कोपर्डीप्रकरणानंतर देशभर कँडलमार्च निघाले, शोकसभा झाल्या; परंतु खैरलांजी प्रकरणात समाज, देश का उभा राहिला नाही? असा सवाल एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी केला. राजकारणात जात आणि धार्मिकतेचा शिरकाव होत असल्याने मानसिकता दुभंगत असल्याचे भिडे यांनी सांगितले. जोपर्यंत चहा आहे तोपर्यंत प्रिंट वृत्तपत्रांना भीती नाही असेही त्या म्हणाल्या.
कुरकुरीत भजी
यावेळी स्व. प्रमोद महाजन यांनी प्रोत्साहन दिले तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आर्इंना घरी आले, तर ‘राहीचं माहेर माझं आजोळ’ असे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे. दिलखुलास व्यक्तीमत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: बनविलेल्या कुरकुरीत भजीची आठवण भिडे यांनी सांगितली.
संत कवयित्रींची बंडखोरी प्रेरणादायी
बीड : तेराव्या शतकात संत कवियत्रींनी समाजव्यवस्थेची चौकट मोडून विद्रोह केला. त्यांची बंडखोरी प्रेरणादायी आहे. प्रस्थापितांविरुद्ध बंड करताना स्वत: सक्षम असले पाहिजे हा विचार संत कवियत्रींनी दिला. त्यांनी समाजाला एकसंघ ठेवले. हा ठेवा जतन करण्याची गरज आहे, असा सूर ‘मराठी संत कवियत्रींची बंडखोरी’ या विषयावर परिसंवादात उमटला.
डॉ. मीरा घांडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद झाला. सुशीला सोलापुरे, वैशाली गोस्वामी, सुलभा मुंडे, संगीता मोरे यांनी यात सहभाग घेतला. संत कवयित्रींच्या साहित्याची चिकित्सा तसेच त्यांनी दाखवलेल्या मार्गाने नवोदित लेखिका व कवयित्रींना जावे लागेल अशी अपेक्षाही मांडली. संत मुक्ताबार्इंनी वात्सल्याचा तर जनाबाईंनी स्त्रीत्वाचा गौरव केला. संत कवयित्रींच्या मागे पुरुष खंबीरपणे उभे होते असेही मत मांडले. संत साहित्यिकांनी लोकभाषा रुजविली. त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे असल्याचे मत व्यक्त झाले. सूत्रसंचालन अॅड. मंजुश्री दराडे, अंजली वाघमारे यांनी आभार मानले.