शासकीय नर्सिंग महाविद्यालयात केवळ चारच पाठ्यनिर्देशिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:35 AM2021-02-11T04:35:20+5:302021-02-11T04:35:20+5:30
बीड : येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी केवळ चारच पाठ्यनिर्देशिका असल्याचे समोर आले आहे. या महाविद्यालयात मंजूर ...
बीड : येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी केवळ चारच पाठ्यनिर्देशिका असल्याचे समोर आले आहे. या महाविद्यालयात मंजूर असलेल्या ३१ पदांपैकी केवळ सहाच पदे भरलेली आहेत. इतर सर्व रिक्त आहेत. त्यामुळे आहे त्यांच्यावर अध्यापनाचा ताण वाढला आहे. ही पदे भरण्याची मागणी होत आहे.
बीड जिल्हा रुग्णालयांतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू आहे. येथे एएनएम व जीएनएम अभ्यासक्रम आहे. येथे जवळपास १०० पेक्षा जास्त विद्यार्थी कायम शिक्षण घेत असतात. परंतु, त्यांना अध्यापन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे २०११ साली बीडमध्ये महाविद्यालय सुरू झाले, तेव्हापासून अद्यापही पूर्णपणे पदभरती करण्यात आलेली नाही. प्राचार्य, उपप्राचार्य ही महत्त्वाची पदे प्रभारींवर सुरू आहेत. तसेच पाठ्यनिर्देशिकाही नसल्याने अडचण होत आहे. आहे त्या चार ते पाच लोकांवर कामाचा ताण वाढत आहे. प्रशासकीय कामकाज पाहण्यासह अध्यापनावर लक्ष केंद्रित करताना अडचण होत आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.
दरम्यान, आरोग्य विभाग हा माणसाच्या जीवन मरणाशी संबंधित आहे. परिचारिका तर रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते सुटी होईपर्यंत काळजी घेत असतात. त्यामुळे त्यांना परिपूर्ण व दर्जेदार शिक्षणाची नितांत गरज आहे. परंतु, बीडमध्ये केवळ बोटावर माेजण्याइतक्या लोकांकडूनच अध्यापन केले जात आहे. असे असतानाही आरोग्य विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. ही पदे तत्काळ भरण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
कोट
महाविद्यालयातील रिक्त पदांबाबत संचालकांना प्रस्ताव पाठविला आहे. आमच्याकडे अपुरे मनुष्यबळ आहे, हे खरे आहे.
डॉ. सुवर्णा बेदरे, प्राचार्या, शासकीय नर्सिंग महाविद्यालय बीड
काेट
रिक्त पदे भरण्याबाबत गतवर्षी जाहिरात काढलेली आहे. शासनाचे जसे धोरण आहे, तसे ही पदे भरली जातील. ५० टक्के पदे भरण्याच्या हालचाली सुरू आहेत. इतर पदे दुसऱ्या टप्प्यात भरली जातील.
डॉ. सुनीता गोल्हाईत, उपसंचालक (शुश्रुषा) आरोग्य सेवा मुंबई
---
अशी आहेत रिक्त पदे
पदे मंजूर रिक्त
प्राचार्य ११
उपप्राचार्य ११
पाठ्यनिर्देशिका १९ १५
लघुटंकलेखक ११
गृहपाल/वॉर्डन ४४
वरिष्ठ लिपिक १०
ग्रंथपाल ११
प्रयोगशाळा सहाय्यक१०
क्लिनिकल इन्ट्रॅक्टर २२
एकूण ३१ २५