चार हजार शेतकऱ्यांनीच भरले वीजबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:02 AM2021-03-04T05:02:33+5:302021-03-04T05:02:33+5:30
दीपक नाईकवाडे केज : तालुक्यातील २० हजार ६७८ कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे १५१ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी केवळ ...
दीपक नाईकवाडे
केज : तालुक्यातील २० हजार ६७८ कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे १५१ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी केवळ चार हजार शेतकऱ्यांनी वीजबिलापोटी १४ लाख ८ हजार ४६७ रुपयांचा भरणा केल्याची माहिती केज विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागाचे सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, कृषिपंपाच्या वीजबिलाचा भरणा करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसत आहे. केज तालुक्यातील २० हजार ६७८ कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे १५१ कोटी ९४ लाख रुपयांची वीजबिलाची थकबाकी होती. कृषिपंपाच्या वीजबिलाची थकबाकी वसूल करण्याचे आदेश आल्यापासून केज विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता राजेश आंबेकर हे तालुक्यातील गावागावांत जाऊन बैठका घेऊन शेतकऱ्यांना कृषिपंपाचे थकीत वीजबिल भरण्याचे आवाहन करत आहेत, तसेच वीज कंपनीच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहेत. या आवाहनाला प्रतिसाद देत, तालुक्यातील २० हजार ६७८ कृषिपंपधारक शेतकऱ्यांपैकी केवळ चार हजार शेतकऱ्यांनी १४ लाख ८ हजार ४६७ रुपयाचा भरणा केला. शेतात उत्पादित केलेल्या पिकांना भाव नाही, त्यातच कोरोनाचे संकट काही कमी होत नसल्याने याचा परिणाम शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नावर झाला असल्याने, कृषिपंपाचे वीजबिल भरण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. वीजबिल भरल्यानंतरच रोहित्राचा वीजपुरवठा कृषिपंपाचे वीजबिल शेतकऱ्यांनी भरावे, यासाठी विद्युत रोहित्राचा वीजपुरवठा खंडित केला असून, ज्या रोहित्रावरचे शेतकरी वीजबिलाचा भरणा करतील, त्याच रोहित्राचा वीजपुरवठा चालू करण्यात येत आहे.