कार्यालय ऑक्सिजनवरच, पुन्हा तात्पुरते एआरटीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:01 AM2021-02-06T05:01:47+5:302021-02-06T05:01:47+5:30
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला पुन्हा ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. हक्काच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करूनही ते रुजू न झाल्याने ...
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला पुन्हा ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. हक्काच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करूनही ते रुजू न झाल्याने आता आणखी तात्पुरते एआरटीओ म्हणून औरंगाबादच्या अधिकाऱ्यांकडे पदभार दिला आहे. त्यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला. मागील दोन महिन्यांत तीन अधिकारी बदलले आहेत.
बीडमधील एआरटीओ कार्यालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. या कार्यालयाला कायमस्वरूपी अधिकारी मिळत नाहीत. कायम प्रभारींवरच याचे काम चालते. जे प्रभारी आहेत, ते देखील कधी कार्यालयाकडे फिरकत नाहीत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजांसह वाहनधारकांची कामे खोळंबत आहेत. या कार्यालयात आल्यानंतर कधीच वेळेवर काम होत नाही, अशी ओळख सामान्यांमध्ये आहे. त्यातच आता कसेबसे जयंत चव्हाण नामक हे अधिकारी या कार्यालयात नियुक्त झाले होते. जानेवारी महिन्यात त्यांची ऑर्डरही आली. परंतु ते रुजूच झाले नाहीत. त्यामुळे औरंगाबाद येथील रामचंद्र खराडे यांची या कार्यालयात तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. या आगोदर जालना येथील अधिकारी विजय कव्हाळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. ते कधीतरी बीडला येत होते. त्यामुळे सर्व कामे रखडली होती. आता खराडे हे पुढील अधिकारी येईपर्यंत याच कार्यालयात थांबणार आहेत. त्यामुळे कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.