महावितरणकडून मार्चमध्ये केवळ ४ कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:14 AM2021-05-04T04:14:41+5:302021-05-04T04:14:41+5:30
पुरूषोत्तम करवा लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : येथील महावितरण कंपनीला मार्च महिन्यात ११ कोटी रूपयांचे उद्दिष्ट असताना, ...
पुरूषोत्तम करवा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील महावितरण कंपनीला मार्च महिन्यात ११ कोटी रूपयांचे उद्दिष्ट असताना, केवळ चार कोटी रुपयांची वीजबिल वसुली झाली. कोरोनामुळे यावर्षी केवळ ३५ टक्केच वसुली होऊ शकली. त्यामुळे महावितरण कंपनीला चांगलाच फटका बसला आहे.
माजलगाव उपविभागात माजलगाव शहरासह ९० गावे तांडे, वस्ती यांचा समावेश होतो. महावितरण कंपनीकडून २०१९-२०मध्ये चांगली वसुली झाली होती. परंतु, २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोनाचा कहर राहिल्याने त्याचा फटका महावितरणला चांगलाच बसला आहे. यामुळे ७-८ महिने वसुलीदेखील करता आली नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात थोड्याफार प्रमाणात वसुली होऊ शकली. नियमित ग्राहकांनी मात्र दरमहा बिलाचा भरणा केला. मात्र, अपेक्षेप्रमाणे वसुली न होता थकबाकीचा आकडा वाढला. गेले वर्षभर वसुली नसल्याने महावितरण कंपनीने माजलगाव उपविभागाला मार्चमध्ये अकरा कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. मोठे उद्दिष्ट असल्याने या उपविभागात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी चांगला जोर लावून वसुलीला सुरुवात केली. कोरोनामुळे विस्कळीत झालेली बाजारपेठेची परिस्थिती पाहता, त्यांना हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आले. मार्च महिन्यात केवळ ३ कोटी ९३ लाख ८१ हजार रुपये एवढीच वसुली करण्यात यश मिळाले.
-----------
ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे
दरवर्षी माजलगाव उपविभागात चांगली वसुली होते. यामुळे अनेक वर्षांपासून या उपविभागात लोडशेडिंग होऊ शकले नाही. ग्राहकांनी वीजबिले भरल्याने त्यांना सुरळीत वीज मिळू शकली होती. कोरोनामुळे मागील आर्थिक वर्षात महावितरण कंपनीला वसुलीमध्ये चांगलाच फटका बसला. वसुली कमी झाली असली, तरी आम्ही वीजपुरवठा सुरळीत ठेवला. यापुढे ग्राहकांनी आपली बिले भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे.
- सुहास मिसाळ, उपविभागीय अधिकारी, महावितरण कंपनी, माजलगाव
माजलगाव उपविभाग
वीज ग्राहक १८,४००
माजलगाव शहर ७,०००
उद्दिष्ट ४ कोटी
वीजबिल वसुली
माजलगाव शहर १,०३,००००० (एक कोटी तीन लाख)
ग्रामीण व शेतीपंप २,९०,८१००० (दोन कोटी ९० लाख ८१ हजार)
------------