उघड्या रोहित्राचा बालकाला शॉक; नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:35+5:302021-07-31T04:34:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केज : उघड्या रोहित्राजवळच्या झाडावरील सीताफळ काढताना विद्युत तारेचा शॉक लागल्याने दहा वर्षांचे बालक जखमी झाल्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : उघड्या रोहित्राजवळच्या झाडावरील सीताफळ काढताना विद्युत तारेचा शॉक लागल्याने दहा वर्षांचे बालक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. ही बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ त्या मुलास लाकडाच्या साहाय्याने दूर करत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
केज शहरात वीजपुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणी रोहित्र बसविण्यात आलेले आहे. मात्र, काही रोहित्रांजवळ कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था विद्युत वितरण कंपनीने केल्याचे दिसत नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या कंपाउंड वाॅलवर बसविलेल्या रोहित्राजवळ झाडाला लागलेली सीताफळे तोडण्यासाठी फुले नगर भागातील सचिन पोपट पवार नामक बालक शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गेले होते. सीताफळ तोडत असताना त्यास उघड्या रोहित्रातील विजेच्या तारेचा शॉक लागल्याने तो रोहित्राजवळच खाली पडल्याने त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव झाला. यातच तो बेशुद्ध पडला. यावेळी त्याच्या सोबत असणारा मित्र मोठ्याने रडत त्यास काढण्यासाठी कंपाऊंड वॉलवर चढण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब जवळच गॅरेज असलेले दिलीप बरुरे, अभय कुलकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्याला ओरडून थांबविले आणि शॉक लागून बेशुद्धावस्थेतील सचिनला काठीने बाजूला केले. नंतर त्यास तत्काळ रिक्षातून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविण्यात आले.
रोहित्राजवळ झाडे नसावीत
वीज पुरवठा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या विद्युत रोहित्राजवळ साधारण सात ते आठ फुटांपर्यंतची झाडेच नसली पाहिजेत, अशी माहिती विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता रवींद्र कोलप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
त्या मुलास शॉक बसला नाही
हा मुलगा सीताफळ तोडत असताना खाली पडला. त्यास विजेचा शॉक बसला असता तर तो भाजला असता. मात्र, तो कोठेही भाजला नाही. त्यास विद्युत शॉक बसला की नाही, हे वैद्यकीय तपासणीत दिसून येईल, असे उप कार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी सांगितले.
कल्पना देऊनही सुरक्षा नाही
केज शहरातील पाण्याच्या टाकीच्या कंपाउंड वॉलवर बसविलेल्या डीपीच्या तारा उघड्या आहेत. डीपीजवळच्या झाडावरील सीताफळ काढताना दहा वर्षीय मुलाला उघड्या तारांचा शॉक बसल्याने तो डी.पी.जवळच पडला. त्यास काठीने ढकलून बाजूला काढले. डी.पी.च्या तारा उघड्या असल्याची माहिती वीज कंपनीला अनेकदा देऊनही त्यांनी कोणतीही सुरक्षेची व्यवस्था केली नाही, असे परिसरातील व्यावसायिक दिलीप बरुरे यांनी सांगितले
300721\img-20210730-wa0013.jpg
याच पाण्याच्या टाकीच्या कंपाउंड वॉल वर बसविण्यात आलेल्या डीपीच्या उघड्या तारेचा शॉक सीता फळ काढत असलेल्या दहा वर्षीय सचिन पवार यास बसला .