"भाजपाला संधिसाधू जवळचे, पंकजा मुंडे माझ्यासारखे दूरचे"; एकनाथ खडसेंची खदखद बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 02:14 PM2023-06-03T14:14:03+5:302023-06-03T14:15:14+5:30
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट
परळी (बीड): राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची परळीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खडसे- मुंडे यांच्यात काही मिनिटे बंददारा आड चर्चा झाली. यावेळी पंकजा मुंडे यांची व आपली कौटूंबिक भेट आहे. याचा राजकारणाशी काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण खडसे यांनी दिले. मात्र, पंकजा मुंडे यांची सध्या भाजपमध्ये झालेली स्थिती पाहून आपल्याला वेदना होत असल्याची खंत देखील खडसे यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नववा स्मृतिदिनी परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर जाऊन तीन जून रोजी सकाळी राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यानंतर एकनाथ खडसे यांनी परळी शहरातील निवासस्थानी जाऊन पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांच्यात बंद दरवाजा आड चर्चा झाली. त्यानंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी पंकजा मुंडे यांची व आपली कौटूंबिक भेट आहे. याचा राजकारणाशी काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण खडसे यांनी दिले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपाने संधीसाधू लोकांना जवळ केले आणि माझ्या सारख्यांना व पंकजा मुंडे यांना दूर केले आहे, अशी खदखद खडसे यांनी व्यक्त केली.
पंकजा मुंडे यांची स्थितीपाहून वेदना
खडसे पुढे म्हणाले, राजकारणात गोपीनाथराव मुंडे आणि मी अनेक वर्ष मिळून काम केले आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. राज्यात संघर्ष यात्रा काढल्या. बहुजन समाजापर्यंत भाजप पक्ष नेण्याचे काम गोपीनाथराव मुंडे यांनी काम केले आहे. परंतु, सध्या भाजपचे स्वरूप बदलले आहे. जुन्या लोकांना मागे करून त्यांचा मानसिक छळ सुरू केला आहे. नव्याने आलेल्या लोकांचे भाजपामध्ये योगदान शून्य आहे. परंतु, पंकजा मुंडे यांची सध्या भाजपमध्ये झालेली स्थिती पाहून आपल्याला वेदना झाल्या असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.