कुटुंब झोपले छतावर अन् चोरट्यांनी साधली संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:34 AM2019-04-09T00:34:25+5:302019-04-09T00:35:19+5:30
उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुटूंब घराच्या छतावर झोपले. हीच संधी साधून चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख रकमेसह दागिने असा ६८ हजार रूपयांचा ऐवज घेऊन ते पसार झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुटूंब घराच्या छतावर झोपले. हीच संधी साधून चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख रकमेसह दागिने असा ६८ हजार रूपयांचा ऐवज घेऊन ते पसार झाले. ही घटना बीड तालुक्यातील मोरगाव येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने पुन्हा एकदा नागरिक गाफील राहत असल्याचे समोर आले.
संतोष शेषेराव जोगदंड (रा. मोरगाव ता.बीड) हे यांचे एकत्र कुटुंब आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गरमी होत असल्याने हे सर्व कुटूंब घराच्या छतावर झोपले. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधत घरात प्रवेश केला आणि दागिने, रकमेसह ६८ हजार रूपयांचा ऐवज घेऊन त्यांनी पोबारा केला. हा प्रकार सकाळी जोगदंड यांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच नेकनूर ठाण्याचे सपोनि मनोज केदारे, पोउपनि हर्ष वाघमारे आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आला. त्यानंतर श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. दुपानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी जोगदंड यांच्या फिर्यादीवरून नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोउपनि वाघमारे हे करीत आहेत.