डेपोत कचरा टाकण्यास वडारवस्तीचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:47 AM2019-05-30T00:47:08+5:302019-05-30T00:48:08+5:30
शहरातील कचरा डेपोमुळे प्रदूषणात वाढ होऊन वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बुधवारी डेपोच्या गेटवर कचरा घेऊन गेलेल्या घंटा गाड्या वडार वस्तीतील लोकांनी अडवून विरोध केला. गाड्याच्या चालकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली.
केज : शहरातील कचरा डेपोमुळे प्रदूषणात वाढ होऊन वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बुधवारी डेपोच्या गेटवर कचरा घेऊन गेलेल्या घंटा गाड्या वडार वस्तीतील लोकांनी अडवून विरोध केला. गाड्याच्या चालकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. मात्र नागरिक आक्र मक झाल्याने चालकांनी गाड्या परत माघारी फिरविल्या.
नगरपंचायतीने कचरा डेपोसाठी बीड रस्त्यावरील गायरान जमिनीतील दीपाली तांबे यांच्या खडी सेंटरची जागा आरक्षित केलेली आहे. या जागेच्या संरक्षण भिंतीलगत वडार समाजाची वस्ती वसलेली आहे. या वस्तीवरील नागरिकांचा कचरा टाकायला विरोध आहे.
डेपोत टाकलेला कचरा पेटवून दिला जात असल्याने धुराचे लोट आणि जळण्याचा उग्र वास वडारवस्तीत पसरू लागल्याने वातावरण दूषित होऊन प्रदूषण वाढले. त्यामुळे नागरिक आक्रमक बनले.
सामाजिक कार्यकर्त्या अॅड. प्रगती केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली वस्तीवरील महिला आणि नागरिकांनी बुधवारी दुपारी डेपोच्या गेटवर जाऊन कचरा टाकण्यासाठी आलेल्या घंटा गाड्या आणि अग्नीशमन दलाचे वाहन अडवून कचरा टाकण्यास विरोध केला. यावेळी घंटा गाड्याच्या चालकांनी ‘तुमच्या बापाची जागा आहे का ? तुम्ही कोण घडविणार ?’ अशी हुज्जत घातली. मात्र नागरिक आक्रमक बनल्याने चालकांनी नमती बाजू घेत गाड्या परत माघारी फिरवून काढता पाय घेतला.
दरम्यान, मागील आठवड्यात कचरा डेपोमध्ये पेटवून दिलेल्या कचऱ्याचा धूर वडारवस्तीतील नयना विजू पवार या बालिकेच्या पोटात गेल्याने मळमळ आणि उलट्या होऊन मृत्यू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे वस्तीवरील नागरिक आक्र मक बनले आहेत. कचरा डेपोमुळे या भागातील रहिवाशांना दुर्गंध व धुळीच्या लोटाने त्रस्त व्हावे लागत होते. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत होता. यामुळे शेवटी नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
डेपोत कचरा टाकणे बंद न केल्यास नागरिकांना घेऊन उपोषणास बसू, असा इशारा सामाजिक कार्यकत्या अॅड. प्रगती केंद्रे यांनी दिला आहे.