नेकनूर कोविड केअर सेंटर उभारणीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:32+5:302021-05-09T04:35:32+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून, दररोज १३०० पेक्षा जास्त रुग्ण पॉझटिव्ह येत आहेत. यावर मात करण्यासाठी अनेक ...
बीड : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून, दररोज १३०० पेक्षा जास्त रुग्ण पॉझटिव्ह येत आहेत. यावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. तालुक्यातील नेकनूर येथे देखील काही सेवाभावी संस्थांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत मोफत सेंटर उभारण्यात येणार होते. त्यासाठी प्रशासनाने परवानगीदेखील दिली आहे. मात्र, परिसरातील काही नागरिकांनी त्या कोविड केअर सेंटरला विरोध केला आहे.
नेकनूर व परिसरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांना उपचारासाठी किंवा विलगीकरणासाठी बीड येथे यावे लागत आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होते असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेकनूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत मूलभूत सुविधा असल्याने येथे सरपंच व गावातील काही युवकांनी एकत्रित येवून मोफत कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतली. त्याठिकाणी आवश्यक त्या सर्व गोष्टीदेखील आणण्यात आल्या आहेत. ही जागा जिल्हा परिषदेची असून, जवळपास ७ एकरचा परिसर आहे. मात्र, शाळा परिसराच्या जवळील थेटे कॉलनी व शहाबाज कॉलनी येथील काही लोकांनी या कोविड केअर सेंटरला विरोध केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विरोध करणाऱ्यांचा बंदोबस्त करून कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी होत आहे. याठिकाणी मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
शाळेच्या आवारात खेळतात पत्ते
ज्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करायचे आहे. शाळा बंद आहे. या ठिकाणी जुगार, मटका, लुडो गेम, दारू पार्ट्या असे अवैध धंदे चालतात. शौचास जातात, जनावरे बांधतात, टोळक्याने एकत्रित बसून गप्पा मारतात. त्यामुळेदेखील कोविड सेंटरला विरोध केला जात आहे. सेंटर सुरू झाल्यानंतर बीडच्या कोविड सेंटरवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे सेंटर सुरू करण्यास प्रशासनाने हास्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त केले जात आहे.
समितीने काम थांबविले
नेकनूर येथील काही सेवाभावी नागिरकांनी एकत्र येत कोविड केअर सेंटर समिती स्थापन करून हे कोविट सेंटर सुरू केले आहे. याठिकाणी परिसरातील नागरिकांसाठी डॉक्टरांकडून मोफत औषधोपचार तसेच जेवण, पाणी, बेड व इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी जवळपास समितीने ९५ हजार रुपये देखील खर्च करण्यात आले आहेत. त्यात सरपंचांनी ५० हजार खर्च केले आहेत. मात्र काही जणांच्या विरोधामुळे समितीने हे काम थांबिवले आहे, असे समितीकडून सांगण्यात आले.
...