इमामपूरच्या बैलगाडी शर्यतीला विरोधक-सत्ताधाऱ्यांची 'चाके'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:43+5:302021-09-25T04:36:43+5:30
बीड : तालुक्यातील इमामपूर येथे यात्रेची परंपरा कायम ठेवण्यासाठी नियम डावलले आहेत. बंदी असतानाही या गावात प्रती वर्षाप्रमाणे बैलगाडी ...
बीड : तालुक्यातील इमामपूर येथे यात्रेची परंपरा कायम ठेवण्यासाठी नियम डावलले आहेत. बंदी असतानाही या गावात प्रती वर्षाप्रमाणे बैलगाडी शर्यत गुरुवारी घेण्यात आली. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शर्यतीला उपस्थिती दर्शवित अप्रत्यक्षरीत्या पाठबळाची 'चाके' लावल्याचे दिसत आहे.
इमामपूर येथे प्रत्येक वर्षी म्हसेाबा यात्रेनिमित्त यात्रा भरविली जाते. याच दिवशी येथे परंपरेप्रमाणे बैलगाडी शर्यत घेतली जाते. परंतु सध्या शासनाने बैलगाडी शर्यतीला बंदी घातलेली आहे. असे असतानाही गुरुवारी वडगाव कळसंबर व आनंदवाडी या परिसरात ही शर्यत झाली. विशेष म्हणजे या शर्यतीला राज्यातील विरोधक असलेल्या भाजपचे आणि सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हजरे लावली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी तर पत्रक काढत आपल्याच हस्ते शुभारंभ झाल्याचे म्हटले आहे, तर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे बंधू गणेश खांडे, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, तालुकाप्रमुख गोरख सिंघन आदींनी उपस्थिती लावली होती. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनीच नियमबाह्य कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. या प्रकरणाची आता प्रशासन किती दखल घेते, कारवाई करते की नाही, हे येणारी वेळच ठरवेल.
---
याबाबत मला आताच समजले आहे. याची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल.
मुस्ताफा शेख, सहायक पोलीस निरीक्षक नेकनूर
--
शर्यतीची परंपरा आहे. ही शर्यत सरपंचाने आयोजित केली होती. मी असताना शिवसेनेचे काेणीच आले नव्हते. उद्घाटनात त्यांचा काही संबंध नाही.
राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष भाजप
240921\24_2_bed_8_24092021_14.jpeg
इमामपुर परिसरात गुरूवारी झालेल्या बैलगाडी शर्यतीचे बोलके छायाचित्र.