तोंडी कराराने ११ लाखांच्या मेंढ्या घेतल्या; पैसे मागताच मेंढपाळाला संपवले, सूत्रधार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 02:35 PM2021-12-14T14:35:17+5:302021-12-14T14:40:02+5:30
मेंढ्यांच्या विक्रीतील ११ लाखांची मागणी केल्याने मेंढपाळाचा खून केल्याचे पुढे आले आहे
सिरसाळा (जि. बीड) : मेंढ्यांच्या विक्री व्यवहारातील ११ लाख रुपयांसाठी तगादा लावल्याने मेंढपाळाची बतईने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा उलगडा करत सिरसाळा पोलिसांनी एका आरोपीला जेरबंद केले होते. या प्रकरणातील सूत्रधाराला रविवारी माजलगाव येथे बेड्या ठोकण्यात आल्या. भालचंद्र ऊर्फ पिंटू हेगडकर असे या सूत्रधाराचे नाव आहे.
मेंढपाळ असलेले चंद्रकांत देवकते यांनी काही महिन्यांपूर्वी ११ लाख रुपये किमतीच्या ५० मेंढ्या भालचंद्र ऋर्फ पिंटू रामकिसन हेगडकर (३५, रा. ममदापूर, ता.अंबाजोगाई) यास विक्री केल्या होत्या. दिवाळी पाडव्यापर्यंत ११ लाख रुपये देण्याचा तोंडी करार केला होता. मात्र, दिवाळी पाडवा होऊनही हेगडकर पैसे देत नसल्याने चंद्रकांत देवकते हे त्यास वारंवार पैशाची मागणी करत होते. यातून हेगडकर याने अन्य तीन मित्रांना सोबत घेऊन चंद्रकांत देवकते यांची हत्या केली.
चौघांपैकी भागवत सखाराम उजगरे यास सिरसाळा पोलिसांनी ९ डिसेंबर रोजी दिंद्रूड येथून ताब्यात घेतले असून तो सध्या कोठडीत आहे. तर भालचंद्र ऊर्फ पिंटू हेगडकर याला पोलिसांनी माजलगावातून अटक केली. त्यास सोमवारी माजलगाव सत्र न्यायालात हजर केले असता १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी दिली.