ड्रॅगन फ्रुटची फळबाग बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:24+5:302021-07-31T04:34:24+5:30
: तीन वर्षांत सहा लाखांचे उत्पन्न नितीन कांबळे कडा (जि. बीड) : शिक्षक म्हणजे शिक्षणच नव्हे, शिक्षकाने जर ...
: तीन वर्षांत सहा लाखांचे उत्पन्न
नितीन कांबळे
कडा (जि. बीड) : शिक्षक म्हणजे शिक्षणच नव्हे, शिक्षकाने जर कुठली गोष्ट मनावर घेतली, तर असाध्य गोष्ट साध्य करण्याची धमक शिक्षकामध्ये असते. गेल्या वीस वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या विनाअनुदानितच्या चक्राला भेदून पगार अनुदानाची वाट न पाहता स्वकर्तृत्वावर शेतामध्ये जिद्द पणाला लावून शिक्षक हा शेतकरीसुद्धा असतो, तो फक्त फळ्यावरच्या नव्हे, तर शेतामध्येसुद्धा अभिनव प्रकल्प करून दाखवू शकतो, असा अभिनव प्रकल्प आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथील अंशतः अनुदानावर असलेले शिक्षक विश्वनाथ शेकडे यांनी करून दाखविला आहे. त्यांनी दोन एकरांत तीन वर्षांत सहा लाख रुपयांचे उत्पन्न काढले.
तालुक्यातील म्हसोबाची वाडी या ठिकाणी २०१९ मध्ये दोन एकर शेतीमध्ये त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. या फळबागेला आता दुसऱ्यांदा फळे येण्यास सुरुवात झाली असून, शेकडे यांचा हा अभिनव प्रकल्प यशस्वी ठरला आहे. एकदाच यामध्ये पैशाची गुंतवणूक करून कमी खर्चामध्ये व कमी पाण्याच्या प्रमाणात या ड्रॅगन फ्रुटची लागवड त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे.
आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यानंतर ड्रॅगन शेती करण्यासाठी शेकडे यांचाच नंबर लागतो. सध्या या ड्रॅगन शेतीला कुठेही बाजारात इतर फळासारखी स्पर्धा नसून, आयुर्वेदासाठी उपयुक्त असलेली व भरघोस उत्पादन देणारी ही शेती चार पैसे शेतकऱ्यांना नक्कीच कमवून देईल, असे विश्वनाथ शेकडे यांनी सांगितले आहे.
ड्रॅगन फ्रुट या फळांचा हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होतो. आरोग्याच्या दृष्टीने ड्रॅगन फळाला गेल्या काही वर्षांपासून मागणी वाढत आहे.
परदेशी फळांना भारतीय बाजारपेठेत मागणी वाढत आहे. पुण्यातही परदेशी फळांची आवक वाढत आहे. मात्र, भारतीय बाजारपेठेतून या फळाला असलेली वाढती मागणी विचारात घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फळाचे उत्पादन सुरू करणे महत्त्वाचे आहे. ड्रॅगन फळाला प्रतिकिलो एकशे वीस ते दीडशे रुपये असा भाव मिळतो. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून या फळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे फळ अत्यंत उपयुक्त आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, बीड जिल्ह्यातील आष्टी, नगरमधील मिरजगाव, सातारा जिल्ह्यातील फलटण भागात ड्रॅगन फळाचे उत्पादन शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे. या फळास कीड तसेच रोगराईचा फटका बसत नाही. त्यामुळे औषध फवारणी कमी करावी लागते. सध्या ड्रॅगन फळाची प्रतवारी उत्तम आहे. ड्रॅगन फळ आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. या फळाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे ग्राहकांकडून या फळांना चांगली मागणी आहे. या फळाचा गर गुलाबी किंवा पांढरा असतो. लाल रंगाचा गर असलेल्या ड्रॅगन फळाला मागणी वाढत आहे. लाल रंगाचा गर असलेल्या फळाला प्रतिकिलो वीस ते तीस रुपये जास्त भाव मिळतो. हे फळ चवीला आंबटगोड असते. फळबागेला किमान पंचेचाळीस ते पन्नास वर्षे आयुष्य असते. एका पोलला किमान पन्नास किलो उत्पादन निघते.
दीड वर्षांपूर्वी दोन एकरांत ड्रॅगन फळाची लागवड केली होती. वर्षाला प्रतिएकरामागे दोन लाख रुपये उत्पन्न मिळते. या फळाची लागवड करण्यासाठी औषध फवारणी करावी लागत नाही. वर्षातून दोन वेळा हे पीक येते. शासनाने लागवडीसाठी हेक्टरी एक लाख साठ हजार अनुदान नुकतेच जाहीर केले असून, ते हेक्टरी पाच लाख करावे, अशी मागणी विश्वनाथ शेकडे यांनी केली.
300721\nitin kmble_img-20210730-wa0038_14.jpg~300721\nitin kmble_img-20210730-wa0059_14.jpg