नुकसानाचे प्राथमिक पंचनामे करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:12 AM2021-09-02T05:12:57+5:302021-09-02T05:12:57+5:30
बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पूल-रस्ते वाहून ...
बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पूल-रस्ते वाहून गेले असून, काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे. या सर्व घटनांचे पंचनामा करून प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कृषी, महसूल व पंचायत विभागाला दिले आहेत.
सोमवारी रात्री मुसळधार पावसाने शेतातील जोमात आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर, अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. रस्ते व त्यावरील पूलदेखील खचले आहेत. तर जनावरांसह माणसांचादेखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे या सर्वांचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रशासनाला दिले आहे. दोन दिवसात हे सर्व अहवाल शासनाला सादर केले जाणार असून, त्यानंतर शासनाकडून पुन्हा पंचनामा करून अहवाल सादर झाल्यानंतर मदतीची घोषणा केली जाणार आहे.
नुकसानग्रस्त भागात लोकप्रतिनिधी फिरकलेच नाहीत
जिल्ह्यातील अनेक भागात नुकसान झाले असून, या सर्व नुकसानाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यातील नेते फिरकले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपेक्षित नुकसानभरपाई मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याचे नागरिकांचे मत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कृषी विभागाने जेथे अतिवृष्टी झाली आहे, तेथील पिकांच्या नुकसानाचे प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. - बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड