बिबट्याला ठार मारण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 05:25 AM2020-12-08T05:25:47+5:302020-12-08T05:26:19+5:30
leopard News : उपद्रवी बिबट्या बंदिस्त झाल्यास त्याला मानवी संपर्कापासून दूर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आष्टी : तालुक्यातील वनपरिक्षेत्र आष्टी अंतर्गत सुरुडी, किन्ही, मंगरुळ, पारगाव जो. ता.आष्टी जि. बीड व वनपरिक्षेत्र पाटोदाअंतर्गत मौजे जाटवड परिसरातील, तसेच सोलापूर वनविभागातील मोहोळ वनपरिक्षेत्रातील लिंबेवाडी ता.करमाळा या परिसरात नरभक्षक बिबट्या धुमाकूळ घालत आहे. मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या बिबट्याला पिंजराबंद करण्यास, तसेच गरजेप्रमाणे तज्ज्ञांच्या उपस्थितीत बेशुद्ध करून बंदिस्त करण्याची मंजुरी, तसेच जेरबंद, बेशुद्ध करणे शक्य न झाल्यास ठार मारण्याच्या परवानगीचा आदेश राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्यवन संरक्षक नितीन काकोडकर यांनी दिला. याबाबत पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.बाळासाहेब आजबे, आ.सुरेश धस यांनी पत्रव्यवहार केले होते.
ही कार्यवाही करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद आणि पुणे यांना व त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, इतर व्यक्तींना अधिकृत करण्यात आले आहे. हे आदेश ३१ जानेवारी, २०२१ पर्यंत वैध राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.
शक्यतो बिबट्याला जेरबंद, बेशुद्ध करण्यास प्राधान्य द्यावे. या बिबट्याला ठार मारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पारितोषिक जाहीर करू नये. आवश्यकतेनुसार ‘स्निफर डाॅग’ची सहायता घ्यावी. उपद्रवी बिबट्या बंदिस्त झाल्यास त्याला मानवी संपर्कापासून दूर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.